Nawab Malik: “सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी, विनाकारण मारी धाडीवर धाडी”; अमोल कोल्हेंचा मलिकांना हटके पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 01:48 PM2022-02-23T13:48:06+5:302022-02-23T13:49:01+5:30
Nawab Malik: पण लक्षात ठेवा... पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादी गडी, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
मुंबई: महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या घरी सकाळीच ईडीचे अधिकारी पोहोचले. तिथे त्यांची सुमारे तासभर चौकशी करण्यात आली. त्यानंतर अधिकारी नवाब मलिक यांना सकाळी साडेसातच्या सुमारास ईडी कार्यालयात घेऊन गेले. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडी कार्यालयात मलिकांची चौकशी सुरू करण्यात आली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी खास कवितेच्या माध्यमातून नवाब मलिक यांना पाठिंबा दर्शवला.
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणाच्या गैरव्यवहाराबाबत महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधताना दिसत आहे. यातच आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईविरोधात महाविकास आघाडीतील नेते आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर एक कविता शेअर करून नवाब मलिकांना पाठिंबा दर्शवला आहे.
काय आहे ती कविता?
सत्तेच्या माडीसाठी
ईडीची शिडी
विनाकारण मारी
धाडीवर धाडी
सलते सत्तेवरील
महा-आघाडी
म्हणून कमळाबाई
ती लाविते काडी
तपासयंत्रणा झाल्या
कमळीच्या सालगडी
पाकळ्यांमध्ये नाहीत का
काहीच भानगडी?
पण लक्षात ठेवा...
पुरून उरेल सर्वांना
रांगडा राष्ट्रवादी गडी
असे ट्विट अमोल कोल्हे यांनी केले आहे.
दरम्यान, अंडरवर्ल्डशी कथित संबंध असलेल्या मालमत्तेप्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना समन्स बजावले होते. आता या प्रकरणी नवाब मलिकची चौकशी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते मलिक येथील ईडी कार्यालयात पोहोचले आणि ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ (पीएमएलए) अंतर्गत जबाब नोंदवत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ईडीने १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत छापे टाकले होते आणि अंडरवर्ल्डशी संबधत कथित बेकायदेशीर खरेदी आणि मालमत्तांची विक्री आणि हवाला व्यवहारांसंदर्भात नवीन गुन्हा नोंदवला होता.