अमोल कोल्हेंचं नेमकं काय ठरलंय, लवकरच मोठी घोषणा करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 04:01 PM2019-12-14T16:01:18+5:302019-12-14T16:02:13+5:30
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा ज्यांनी सांभाळली,
मुंबई - राज्यात अखेर शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडीचं सरकार आलं. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळालं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मेहनत फळाला आली. तर, या निवडणूक प्रचारात खारीचा वाटा उचलणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेंच्याही कष्टाचं चीझ झालं. मात्र, निवडणूक निकालानंतर अमोल कोल्हे दूरदूरच दिसून आले. याबद्दल बोलताना, आपली भूमिका संपली की रंगमंच सोडायचा असतो, एवढं मला समजतं अस अमोल कोल्हेंनी सांगितलं होतं.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा ज्यांनी सांभाळली, ज्यांनी राष्ट्रवादी पुन्हा म्हणत उदयनराजेंविरुद्ध साताऱ्यात सभा घेतली, ते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे म्हटलंय. अजित पवार आणि शरद पवार यांच्यापैकी एक अशी परिस्थिती असताना, 'साहेब ठरवतील ते धोरण आणि बांधतील तेच तोरण!' असे म्हणत अमोल कोल्हेंनी पवारांसोबतचा फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला होता. त्यामुळे, खासदार कोल्हे हे पवारांचे शिलेदार बनून राष्ट्रवादीचं काम करणारं हे स्पष्ट झालं. त्यानंतर, आता अमोल कोल्हेंनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले.
18 डिसेंबर रोजी आपण मोठी घोषणा Big Announcement करणार असल्याच अमोल कोल्हेंनी म्हटलंय. अमोल कोल्हेंच्या या फेसबुक पोस्टमुळे राष्ट्रवादीच्या गटात चर्चेला उधाण आलं आहे. अनेकांनी ही शिवनेरी किल्ल्यासंदर्भात घोषणा होईल, असा अंदाज लावला आहे. तर, बैलगाडा शर्यतीचा मुद्दा निकाली निघाला असेल, असेही काहींना वाटत आहे. तसेच, अनेकांनी 18 डिसेंबरची उत्कंठा अशा कमेंट त्यांच्या फेसबुक पोस्टवर केल्या आहेत. काहींना 18 डिसेंबर रोजी शेतकरी कर्ममाफी होईल, असा अंदाज वाटत आहे. कारण, कोल्हेंनी आपल्या फेसबुकवरुन पोस्ट करताना, बॅकग्राऊंडचा रंग भगवा निवडला आहे.