'१३० दिवसानंतर मतदानाची वेळ येणार, आपला पक्ष मजबूत करायचाय'; प्रफुल्ल पटेल यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 08:57 AM2023-12-01T08:57:38+5:302023-12-01T09:00:34+5:30
देशाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने निकाल लागेल असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
मुंबई: माझ्याकडे बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. भविष्यात मी देखील पुस्तक लिहिणार असून त्यावेळी मी माझी बाजू मांडेन आणि त्यात खूप काही मटेरियल मिळेल, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी वैचारिक मंथन शिबिरात केले. आपल्या पक्षाचा प्रवास केवळ विधानसभा, लोकसभा निवडणुकीपर्यंत नाही पुढील २० ते २५ वर्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांना आमचा पक्ष सर्व धर्मांना एकत्र घेऊन जाणारा आहे हे अजित पवार यांनी स्पष्टपणे दिल्लीत सांगितले आहे. शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार घेऊन काम करणार आहोत. येणाऱ्या काळात आपली कसोटी आहे. १३० दिवसानंतर मतदानाची वेळ येणार आहे. शंभर दिवसात निवडणुकीची वाटचाल सुरू होणार आहे. काही राज्यातील निकाल काहीही येतील परंतु देशाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने निकाल लागेल असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
आपला पक्ष, आपलं घर मजबूत करायचे आहे. याकडे लक्ष द्यायचे आहे असे आवाहनही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी केले. जसा शंभर टक्के पवारसाहेबांच्या पाठीशी राहिलो तसा दादांच्या पाठीशी राहणार आहे असेही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. अजितदादा पवार यांनी घेतलेली महत्वाची भूमिका ही राज्यासाठी, देशासाठी आणि पक्षासाठी आहे हेही आवर्जून प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार, अशी माहिती पसरवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. पण, अजित पवार यांच्याच नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस काम करत राहील, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आम्ही भाजपसोबत सत्तेत सहभागी झालो म्हणजे महापाप केले, असा दावा केला जात आहे, पण यापूर्वी किमान चार वेळा भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो शेवटच्या क्षणी फिरवण्यात आला, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या निर्णयाची पाठराखण करतानाच शरद पवार यांनी वेळोवेळी बदललेल्या भूमिकांचा संदर्भ देत हा निर्णय का घेतला त्याचे समर्थन केले.
५३ पैकी ४३ आमदार अजित पवारांसोबत-
राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात निवडणूक आयोगासमोर सुनावणीदरम्यान अजित पवार यांचा भेकड, असा उल्लेख केला, पण त्यांचे नेतृत्व सक्षम आहे म्हणूनच ५३ पैकी ४३ आमदार त्यांच्यासोबत आहेत, याकडे तटकरेंनी पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. देशात भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र येतात, आपल्या वैचरिक भूमिकेशी तडजोड करत नाहीत. मग आम्हीही तसे पाऊल उचलले तर ते चुकीचे कसे, असा प्रश्नही तटकरेंनी विचारला.