खासदार सुनिल तटकरेंना कोरोना, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
By महेश गलांडे | Published: October 27, 2020 12:18 PM2020-10-27T12:18:55+5:302020-10-27T12:19:27+5:30
काल माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे.
मुंबई - राष्ट्रवादीचे राज्यातील मोठे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून ते मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. त्यानंतर, आता राष्ट्रवादीचे आणखी एक ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: फोन करुन दिली.
'काल माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.', असे ट्विट सुनिल तटकरे यांनी केलंय. तटकरेंच्या या ट्विटला रिट्विट करत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपण कोरोनावर सहज मात करुन पुन्हा जनसेवेत दाखल व्हाल ही खात्री असल्याचं म्हटलं आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही तटकरे यांना, काळजी घेण्याचं आवाहन करत, त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
अजित पवारांची प्रकृती उत्तम
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अजित पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. यामध्ये त्यांनी अजित पवार पाच दिवसांत पुन्हा राज्याच्या सेवेत असतील, असे सांगितले. अजित पवार हे शिस्तीचे असल्याने त्यांना सर्व गोष्टी नीट व्हाव्यात असे वाटत होते. यामुळे ते कोरोना काळात दौरे, बैठकांचे सत्र करत होते. मात्र, काळजी घेऊनही त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांची प्रकृती उत्तम असून काळजीचे कारण नाही, असे ते म्हणाले.
आयसोलेशनमध्ये होते अजित पवार
अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून होम आयसोलेशनमध्ये होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, आज त्यांनी यावर आज खुलासा करत कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीवरून उलटसुलट चर्चा सुरु होत्या. अजित पवारांना अंगदुखी, ताप सारखी लक्षणे जाणवत होती. त्यांनी त्यावेळच्या बैठकांमध्ये जवळच्या व्यक्तींनाही लांब राहण्यास सांगितले होते. सुप्रिया सुळेंनाही त्यांनी लांब थांबण्यास सांगितले होते.