MPSC Exam : 'काही विद्यार्थी बाधित, 11 एप्रिलच्या MPSC परीक्षेबाबत सरकारने फेरविचार करावा'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 04:22 PM2021-04-07T16:22:20+5:302021-04-07T16:24:23+5:30
MPSC exam : माथाडी कामगार संघटनेचे नेते नरेंद्र पाटील यांनी ट्विटरवरुन ही मागणी केली आहे.
मुंबई - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलू नये यासाठी आंदोलन करणारे विद्यार्थी आता ११ एप्रिलची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असून, काहीजण दुखणे अंगावर काढत आहेत. परीक्षा झाल्यास कोरोनाचा उद्रेक वाढेल, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून येत आहे. मात्र, अद्याप सरकारकडून यासंदर्भात कुठलेही स्पष्टीकरण नाही. त्यामुळे, सगळीकडे संभ्रम असून हा संभ्रम दूर करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह काही नेत्यांकडून होत आहे. माथाडी कामगार संघटनेचे नेते नरेंद्र पाटील यांनी ट्विटरवरुन ही मागणी केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत एमपीएससीने १४ मार्चची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात परीक्षार्थींनी राज्यभर आंदोलन केले. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय बदलत २१ मार्चला परीक्षा घेण्याचे जाहीर केले. तसेच पुढील परीक्षा नियोजित वेळेत होतील, असे स्पष्ट केले. एमपीएससीची २१ मार्चची परीक्षा वेळेत झाली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ११ एप्रिलला होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेबद्दल अद्याप काहीही सूचना नाही. त्यामुळे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी 11 एप्रिलच्या परीक्षेसंदर्भात योग्य निर्णय घेण्याची मागणी केली आहे. पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मेंशन केलं आहे.
११ एप्रिल रोजी होणाऱ्या MPSC परीक्षेचा राज्य सरकारने फेरविचार करावा.काही विद्यार्थी कोरोना बाधित आहेत तसेच काही जिल्ह्यांमध्ये Lockdown आहे.त्यामुळे मा.मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा.@OfficeofUT@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
— Narendra Patil (@NarendraMathadi) April 7, 2021
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे याचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला आणखी जोर आला आहे. त्यानंतर, आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करुन सरकारने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती. 'लॉकडाऊन' असताना रविवारी (ता.११) होणाऱ्या #MPSC परिक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी. परीक्षा होणार असेल तर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत. तसंच बाधित मुलांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकारने विचार करावा, ही विनंती, असे ट्विट रोहित पवार यांनी केली होते.
मला कोरोना झाला आहे. सौम्य लक्षणे असली तरी खबरदारी म्हणून मी कोविड सेंटरमध्ये दाखल झालो आहे. ११ तारखेची परीक्षा चुकू नये म्हणून अनेकजण दुखणे अंगावर काढत आहेत. परीक्षा झाल्यास कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- महेश घरबुडे, एमपीएससी परीक्षार्थी