अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 09:52 AM2024-10-02T09:52:33+5:302024-10-02T09:54:25+5:30
राहुल गांधी यांच्या टीकेनंतर अंबानी कुटुंबातील अनंत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं दिसून आले.
मुंबई - देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. जवळपास २ तास अनंत अंबानी आणि ठाकरे यांच्यात बैठक झाली. त्यानंतर रात्री उशिरा अनंत अंबानी यांचा ताफा मातोश्रीबाहेर निघाला. अंबानी आणि ठाकरे यांच्या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली हे अद्याप समोर आले नाही. परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
उद्योग व्यवसायासह अनंत अंबानी हे प्राणीमित्र आहेत, प्राण्यांच्या देखभालीसाठी ते वनतारा नावाने ड्रीम प्रोजेक्टही चालवतात. विशेषत: हत्तींच्या संरक्षणासाठी अनंत अंबानी पुढाकार घेतात. गुजरातच्या जामनगर भागात रिलायन्स कॉम्पल्सेच्या जवळ ६०० एकरात वनतारा प्रकल्प अनंत अंबानींनी बनवला आहे. त्याठिकाणी जगभरातील अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्यात. अंबानी कुटुंब हे व्यवसायात तर ठाकरे कुटुंब राजकारणात चर्चेत असते. या दोन्ही कुटुंबाचे सलोख्याचे संबंध आहेत. अनंत अंबानी यांच्या लग्न समारंभाच्या प्रत्येक कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांची हजेरी होती. अनंत अंबानी यांच्या लग्नात तेजस ठाकरे यांनी डान्स केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला होता. यावरून विरोधकांनीही ठाकरेंवर टीका केली होती.
राहुल गांधींनी केली होती टीका
नुकतेच हरियाणा विधानसभेच्या प्रचारात राहुल गांधी यांनी अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या खर्चावरून भाजपाला टार्गेट केले होते. राहुल गांधी म्हणाले होते की, तुम्ही अंबानी कुटुंबातलं लग्न पाहिले का, अंबानींनी लग्नात कोट्यवधीचा खर्च केला हा पैसा कुणाचा आहे? हा पैसा तुमचा आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या लग्नासाठी बँकांकडून कर्ज घेता, परंतु नरेंद्र मोदींनी अशी योजना केलीय, ज्यातून निवडक २५ लोक लग्नात कोट्यवधीचा खर्च करू शकतात. परंतु एक शेतकरी कर्जात बुडून मुलांची लग्न लावतो. जितका पैसा पंतप्रधान मोदींनी अदानी आणि अंबानी यांना दिला तितकेच पैसे आम्ही देशातील गरीबांना देऊ असं त्यांनी म्हटलं होते.