मुक्काम पोस्ट महामुंबई - कार्यकर्त्यांनी किती वर्षे सतरंज्या उचलायच्या?

By अतुल कुलकर्णी | Published: July 17, 2023 10:39 AM2023-07-17T10:39:16+5:302023-07-17T10:40:24+5:30

तरुण पिढी आणि जुने जाणते लोक, महाराष्ट्रात जे काही चालू आहे, त्याला वैतागले आहेत किंवा त्यांचा कोणावरही विश्वास उरलेला नाही.

Mukkam Post Mahamumbai - How many years did the activists lift sataranjaya? | मुक्काम पोस्ट महामुंबई - कार्यकर्त्यांनी किती वर्षे सतरंज्या उचलायच्या?

मुक्काम पोस्ट महामुंबई - कार्यकर्त्यांनी किती वर्षे सतरंज्या उचलायच्या?

googlenewsNext

अतुल कुलकर्णी

काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे असे पाच पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. तुलनेने मनसेची ताकद सगळ्यात कमी आहे. आता राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या. शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या. त्यामुळे आधीच्या पाच पक्षांसोबत नव्याने झालेल्या या दोन गटांचे मिळून सात पक्ष येत्या निवडणुकीत एकमेकांसमोर दंड थोपटताना पाहायला मिळतील. त्याशिवाय आपल्याला तिकीट मिळाले नाही म्हणून, त्या-त्या पक्षातील नाराजही अपक्षाचे झेंडे घेऊन मैदानात उतरतील. महापालिकेच्या निवडणुका आधी झाल्या तर ही बंडखोरी उफाळून येईल. ज्या सहानुभूतीच्या मुद्द्यावरून आजपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या, तो मुद्दा अजूनही कमी झालेला नाही. उद्धव ठाकरेंच्या जोडीला आता शरद पवारांची सहानुभूती देखील सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखीचा विषय होऊ शकते.

ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत सहानुभूती असली तरी गावागावात काम करणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उभी फूट पडली आहे. तरुण पिढी आणि जुने जाणते लोक, महाराष्ट्रात जे काही चालू आहे, त्याला एक तर वैतागले आहेत किंवा त्यांचा कोणावरही विश्वास उरलेला नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासाठी ही गोष्ट आशेचा किरण ठरू शकते. मात्र, दोन्ही नेत्यांचे वय आणि आजारपण लक्षात घेता या दोघांना महाराष्ट्र पिंजून काढणे किती शक्य होईल, यावरही अनेक गणितं अवलंबून असतील. दुसरीकडे भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांचीराष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे जे नेते मागच्या लोकसभेला एकमेकांच्या विरोधात उभे होते, तेच आता एकत्र आले आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघांत उमेदवार नेमका कोणाचा? हा मुद्दा या तिघांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. वरिष्ठ पातळीवर नेत्यांचे आपापसात काहीही ठरले तरी स्थानिक पातळीवर निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्यांच्या आशाआकांक्षा ऐन निवडणुकीच्या काळात उफाळून येतात. नंतर त्या बंडखोरीत परावर्तित होतात, हे असंख्य वेळा घडले आहे. भाजपसोबत सत्तेत सहभागी होताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला. पण, तो त्यांच्या सध्याच्या पक्षातही लागू होतो. शरद पवार यांचे वय ८२ वर्षांचे असले तरी स्वतः अजित पवार ६३ वर्षांचे आहेत. छगन भुजबळ ७५, दिलीप वळसे पाटील ६६, हसन मुश्रीफ ६९, प्रफुल्ल पटेल ६६ वर्षांचे आहेत.

वयाच्या बाबतीत काँग्रेसमध्ये देखील फार वेगळी स्थिती नाही. पृथ्वीराज चव्हाण ७७, अशोक चव्हाण ६४, बाळासाहेब थोरात ७०, नाना पटोले ६० वर्षांचे आहेत. दोन्ही काँग्रेसमध्ये तरुण नेतृत्व उभे करण्यासाठी कोणीही फारसे प्रयत्न केलेले नाहीत. आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो हा आमचा दोष आहे का? असे सांगत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर थेट हल्ला चढवला होता. मात्र हाच सवाल, ज्यांना कसलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, ज्यांच्या घरी कोणी राजकारणी नाही, अशी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय तरुण पिढी नेत्यांना विचारत आहे. तुमच्याकडे घराण्यातच कोणी नेता होता, म्हणून तुमची मुलं राजकारणात आली. पहिल्या झटक्यात त्यांना खासदारकीचे तिकीटही मिळाले. ते नेते झाले. मात्र, आम्हाला कसलीच पार्श्वभूमी नाही, अशावेळी आम्ही आयुष्यभर कार्यकर्ताच राहायचे का? दुसऱ्याच्या दिवाळीला आकाश दिवे करण्यातच आयुष्य घालवायचे का? या प्रश्नांचे उत्तर मात्र अजित पवार यांनी 
दिलेले नाही. 

स्वकष्टातून एखादा तरुण पुढे येत असेल. नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न करत असेल. त्याला काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमधून जाणीवपूर्वक साथ दिल्याचे ठळक उदाहरण नाही. हे दोन पक्ष वगळता शिवसेनेत तरुण कार्यकर्त्यांची आणि नेतृत्वाची कधीच वानवा नसते. शिवसेनेने स्वतःचे संघटनच तरुणांच्या भोवती फिरते राहील, असे तयार केले आहे. भाजपने कोणत्या वयात ज्येष्ठ नेत्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवायचे, याचे नियोजन केले आहे. मुळात काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांना मार्गदर्शक मंडळात जावे, असे कधीही वाटत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राज ठाकरे यांच्याकडे तरुणांचा ओढा वाढत आहे. त्यांच्याकडून थोडेफार प्रयत्न होताना दिसतात. मात्र, त्यांना राज्यभर व्यापक संघटन उभारण्याची गरज आहे. तरुण नेतृत्वाची चणचण मुंबई भाजपमध्ये देखील आहे. ॲड. आशिष शेलार यांच्यानंतर अमुक पाच चेहरे मुंबई भाजपचे अध्यक्ष होऊ शकतात, असे एका दमात सांगण्यासारखी नावे त्यांच्याकडेही नाहीत. नेतृत्व एका रात्रीतून तयार होत नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. मात्र, आपल्याच मुलांना, भावांना राजकारणात सक्रिय करण्याची स्पर्धा ज्येष्ठ नेत्यांमध्ये लागलेली असताना, तरुण चेहरे येतील कसे? महापालिका निवडणुका ही यासाठीची संधी आहे. 

प्रत्येक पक्षाने जाणीवपूर्वक कोरी पाटी असणाऱ्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. त्यांना त्यांच्या वॉर्डापुरते मर्यादित न ठेवता, संपूर्ण शहराचे प्रश्न मांडण्याची, वेळोवेळी भूमिका घेण्याची जाणीवपूर्वक संधी दिली पाहिजे. त्यातून कोण, कसे काम करतो हे लक्षात येईल. नवे नेतृत्वही सापडेल. यासाठी श्रद्धा आणि सबुरी हवी. नेमका याचाच अभाव सर्व पक्षांत आहे. आज आणि आता मला काय मिळेल, या पलीकडे विचार करण्याची कोणाचीही तयारी नाही. 

या प्रश्नांची उत्तरे काेण शाेधणार?

महाराष्ट्राने जगाला शाहू, फुले, आंबेडकर दिले. अनेक धाडसी राजकारणी दिले.  त्या महाराष्ट्रात येत्या दहा वर्षांत कोणते तरुण नेते, प्रभावीपणे पुढे येतील? 

आपापल्या नातेवाइकांच्या पलीकडे जाऊन दोन तरुण कार्यकर्ते घडवण्याचे, त्यांच्यात नेतृत्व गुण निर्माण करण्याचे काम महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते मंडळी करतील का?

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रसेवा दल, युवक बिरादरी, युक्रांद... अशा संघटनांमधून तरुण नेतृत्व महाराष्ट्राला मिळत गेले. आज तरुणांसाठीच्या या संघटनांची दशा काय आहे...?

महाराष्ट्राच्या राजकारणाची जी अवस्था आज झाली आहे, त्यातून वेळ काढून ज्येष्ठांनी या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला, तर ते महाराष्ट्रासाठी भल्याचे ठरेल. तुम्हाला काय वाटते..? 

Web Title: Mukkam Post Mahamumbai - How many years did the activists lift sataranjaya?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.