हा तर काँग्रेसच्या कार्यालयावर केलेला सर्जिकल स्ट्राईक - संदीप देशपांडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 11:10 AM2017-12-01T11:10:47+5:302017-12-01T12:37:53+5:30
मुंबई प्रदेश काँग्रेसच्या सीएसटी येथील कार्यालयाची शुक्रवारी सकाळी तोडफोड करण्यात आली.
मुंबई - मुंबई प्रदेश काँग्रेसच्या सीएसटी येथील कार्यालयावर शुक्रवारी सकाळी हल्ला झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेस कार्यालयावर झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मनसेने नेते संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक..इट का जवाब पथ्थर से मिलेगा.. असे टि्वट केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक..
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 1, 2017
इट का जवाब पथ्थर से मिलेगा..
सुरुवातीला हा हल्ला नेमका कोणी केला याबद्दल स्पष्टता नव्हती. पण हल्ला झाल्यानंतर काहीवेळाने मनसेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून मोठया प्रमाणावर तोडफोड केली. काँग्रेस कार्यालयातील केबिनच्या काचा फोडल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. मोठया प्रमाणावर ही नासधूस करण्यात आली.
यावेळी हल्लेखोरांनी कार्यालयात उपस्थित असलेल्या कोणावरही हल्ला केला नाही. सध्या फेरीवाल्यांच्या मुद्यावरुन काँग्रेस आणि मनसेमध्ये संघर्ष सुरु आहे. काही दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची सभा उधळून लावली होती.
मनसैनिकांना झालेल्या मारहाणीचे संजय निरुपमनी केले होते समर्थन
विक्रोळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांवर फेरीवाल्यांकडून झालेल्या हल्ल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी समर्थन केले होते. विक्रोळीत मनसेच्या गुंडांनी पुन्हा मार खाल्ला. आमचा हिंसेवर विश्वास नाही पण गरीबांच्या पोटावर जेव्हा मनसेचे गुंड लाथ मारणार तेव्हा प्रतिक्रिया ही उमटणारच. त्यामुळे मनसेने गुंडगिरी सोडून द्यावी असे संजय निरुपम यांनी टि्वटमध्ये म्हटले होते.
#Mumbai: Unidentified persons vandalized Mumbai Congress office at CST, more details awaited pic.twitter.com/hqfUDYyBXZ
— ANI (@ANI) December 1, 2017