मुंबई काँग्रेस : सारे कसे शांत शांत... बैठका नाहीत, महापालिका निवडणुकीची चर्चा नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 11:57 IST2025-01-16T11:57:13+5:302025-01-16T11:57:21+5:30
मुंबईमध्ये काँग्रेसची ताकद पहिल्यापासूनच आहे. एकेकाळी काँग्रेसची सत्ता होती. मात्र, त्यानंतर काँग्रेस सातत्याने मुख्य विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे.

मुंबई काँग्रेस : सारे कसे शांत शांत... बैठका नाहीत, महापालिका निवडणुकीची चर्चा नाही
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचे काम विभागीय पातळीवर सुरू आहे. काँग्रेसमध्ये मात्र अजूनही शांतता आहे. वास्तविक, एव्हाना कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायला हवे होते, अशी खंत काँग्रेसचे आ. भाई जगताप यांनी व्यक्त केली आहे.
तसेच या निवडणुका स्वबळावर लढाव्यात, अशीच आपलीही ठाम भूमिका असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी अप्रत्यक्षपणे दिल्यानंतर काँग्रेसनेही स्वबळावर लढविण्याची तयारी दाखविली आहे. मात्र, काँग्रेसने स्वबळावरच लढायला पाहिजे, अशी आग्रही भूमिका आ. भाई जगताप यांनी घेतली आहे.
दिशाभूल करण्यासाठी उठवलेली अफवा ?
मुंबईमध्ये काँग्रेसची ताकद पहिल्यापासूनच आहे. एकेकाळी काँग्रेसची सत्ता होती. मात्र, त्यानंतर काँग्रेस सातत्याने मुख्य विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. काँग्रेसची ताकद संपली किंवा ती क्षीण झाली, ही केवळ दिशाभूल करण्यासाठी उठवलेली अफवा असल्याचा दावाही पक्षाकडून केला जातो आहे.
महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये काँग्रेसची ताकद आहे. विशेष म्हणजे, आमच्या विरोधात लढणाऱ्या सर्वच पक्षांची शकले झाली आहेत. विधानसभा निवडणुकीत काही मोक्याच्या आणि पारंपरिक जागांवर हक्क आम्हाला सोडावा लागला, जे अयोग्यच होते. मात्र, आमच्या सर्व कार्यकर्त्यांना योग्य संधी द्यायची असेल तर आम्हाला निश्चितच स्वबळावर लढावे लागणार आहे. मात्र, त्यासाठी बुथ आणि वॉर्ड पातळीवर तयारी आता सुरू असायला पाहिजे होती. आ. भाई जगताप, माजी अध्यक्ष, मुंबई काँग्रेस