मुंबईसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं, जागावाटपाचा 'हा' आहे फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 06:47 PM2019-09-10T18:47:20+5:302019-09-10T18:47:24+5:30
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली.
मुंबई - काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मुंबईतील जागा वाटप निश्चीत झाले आहे. राजधानी मुंबईत राष्ट्रवादीला 6 तर काँग्रेसला 25 जागांचे वाटप करण्यात आले आहे. तर मित्रपक्षासाठी 5 जागा सोडण्यात आल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिली. सेना-भाजपा युतीप्रमाणेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही जागावाटपाचा फॉर्म्युला तयार होत आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी मुंबईतील जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे मुंबईसाठी राष्ट्रवादीने केवळ 5 जागांवर तयारी दर्शवली आहे. तर, काँग्रेस 25 जागांवर लढवणार आहे. एकनाथ गायकवाड यांना उर्मिला मांतोडकर यांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता, ऊर्मिला मार्तेंडकर यांच्याशी मी स्वत: चर्चा करणार आहे. त्यांची समजूत काढण्यात येईल, असेही एकनाथ गायकवाड यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काही मतदारसंघाबाबत दोन्ही पक्षात मतभेद आहेत. तसेच आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडी संदर्भात शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात आज चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच आघाडी पक्षाच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावरुन बैठक्या सुरू असून यामध्ये जागावाटपाचे सूत्र निश्चित केले असून जवळपास 225 जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. मात्र अजूनही इंदापूरच्या जागेसह 25 ते 30 जागांवर मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या जागांबाबत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.