मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनहास का जगताप?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 05:12 PM2020-11-18T17:12:56+5:302020-11-18T17:13:22+5:30
Mumbai Congress President? : मुंबई कॉंग्रेसचे आगामी अध्यक्षांची नेमणूक लवकर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुंबई कॉंग्रेसचे आगामी अध्यक्षांची नेमणूक लवकर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी म्हाडाचे माजी अध्यक्ष डॉ.अमरजीत मनहास व जेष्ठ कामगार नेते भाई जगताप यांच्यात चुरस आहे.माजी मंत्री सुरेश शेट्टी,माजी मंत्री नसीम खान,चरणजीत सप्रा यांची सुद्धा नावे चर्चेत आहेत.संघटनात्मक दृष्ट्या डोक्यावर बर्फ ठेवून आणि जिभेवर साखर ठेवून कार्यकर्त्यांकडून काम करून घेणारा आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता म्हणून डॉ.अमरजीत मनहास यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळाल्याचे समजते.लोकमत ऑनलाइन आणि लोकमतच्या दि,2 नोव्हेंबरच्या अंकात या संदर्भात दिलेले वृत्त मुंबई पासून दिल्लीपर्यंत व्हायरल झाले होते.
महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांनी मुंबई काँगसच्या नवीन अध्यक्षांच्या नेमणुकीबाबत आणि 2022च्या पालिका निवडणुकीच्या तयारी बाबत दादरच्या टिळक भवन येथे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड,मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख,काँग्रेसचे विद्यमान आमदार, माजी आमदार, माजी एमआरसीसी प्रमुख, युवा अध्यक्ष, महिला व विद्यार्थी संघटनांचे अध्यक्ष, राष्ट्रीय पदाधिकारी, नगरसेवक आणि नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांची मते सुद्धा जाणून घेतली.
एच. के. पाटील यांनी डॉ.अमरजितसिंग मनहास व भाई जगताप यांची भेट घेतली.पाटील यांनी सह्याद्री अतिथी गृहात न्याहारीच्या टेबलावर डॉ मनहास आणि भाई जगताप यांना एकत्र बसवून चर्चा केली व इतरांना आपल्या कृतीतून योग्य तो संदेश दिला. या दोघांनी त्यांनी विविध संघटनात्मक आणि राजकीय विषयांवर वैयक्तिक सविस्तर चर्चा देखिल केली.
पक्षाच्या बाहेर गेलेल्यांना परत आणून , नाराज होऊन घरी बसलेल्याना पुन्हा कामाला लावण्याचे मोठे आव्हान आहे जे डॉ मनहास योग्यरित्या पेलतील असे वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी सांगितले.मनहास यांनी म्हाडाचे अध्यक्ष असतांना 12000 मुंबईकरांना घर दिले होते.तर 2007 च्या पालिका निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे 77 नगरसेवक निवडून आणले होते. त्यांना पक्ष संघटनेचा दांडगा अनुभव असून ते अध्यक्ष म्हणून अधिक यशस्वी ठरतील असे मत सर्वाधिक जणांनी मांडल्याचे समजते.तर स्व.गुरुदास कामत यांच्या काळातील काँग्रेसचे चांगले दिवस पुन्हा डॉ मनहास यांच्या नेतृत्वाखाली येतील असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे समजते.
आज सकाळी विमानाने पाटील हे दिल्लीला गेले असून कालच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीचा सविस्तर अहवाल ते काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या समोर ठेवतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई काँग्रेसचे नवीन अध्यक्ष म्हणून डॉ अमरजीत मनहास यांच्या नावाची औपचारिक घोषणा येत्या दोन - तीन दिवसात दिल्लीहून केली जाईल.
2022 ची पालिका निवडणूक स्वबळावर लढा मुंबई महानगर पालिकेच्या 2022 च्या निबडणुका स्वबळावर लढवाव्यात आणि शक्य असेल तेथे जागा सामायिक करण्यासाठी समविचारी लहान पक्षांना घ्यावे असे मत अनेकांनी एच. के. पाटील यांच्याकडे व्यक्त केले.
येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी, आणि समाजवादी पार्टी यांची गुप्त बोलणी सुरू आहेत,तर भाजपा व मनसे युती होण्याची शक्यता आहे.मात्र काँग्रेस मध्ये अजून अध्यक्ष जर ठरत नसेल तर कार्यकर्ते कामाला कधी व कसे लागणार याबाबत जेष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.2017च्या पालिका निवडणुकीत काँग्रेसचे 29 नगरसेवक निवडून आले होते.सध्याच्या परिस्थितीत 10 सुद्धा नगरसेवक निवडून येणे कठीण आहे असे मत काँग्रेसच्या माजी मंत्र्याने व्यक्त केले. तर कमी पैशात पालिकेची निवडणूक लढायची असेल तर लवकरात लवकर उमेदवार निश्चित करावे लागतील जेणे करून ते स्वतःच्या ताकदीने निवडणुकीच्या कामाला लागतील असे मत देखिल अनेकांनी व्यक्त केले.