मुंबईतील २४ महापालिका वॉर्डांमधील महापालिका कार्यालयांवर मुंबई काँग्रेसचे धडक मोर्चे  

By मनोहर कुंभेजकर | Published: August 5, 2023 07:51 PM2023-08-05T19:51:07+5:302023-08-05T19:51:20+5:30

मुंबई महापालिकेच्या निष्क्रिय व नियोजनशून्य कारभाराविरोधात मुंबईतील महापालिकेच्या २४ वॉर्डमधील कार्यालयांवर मुंबई काँग्रेसतर्फे धडक मोर्चा काढण्यात आला.

Mumbai Congress strike marches on municipal offices in 24 municipal wards of Mumbai | मुंबईतील २४ महापालिका वॉर्डांमधील महापालिका कार्यालयांवर मुंबई काँग्रेसचे धडक मोर्चे  

मुंबईतील २४ महापालिका वॉर्डांमधील महापालिका कार्यालयांवर मुंबई काँग्रेसचे धडक मोर्चे  

googlenewsNext

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निष्क्रिय व नियोजनशून्य कारभाराविरोधात मुंबईतील महापालिकेच्या २४ वॉर्डमधील कार्यालयांवर मुंबई काँग्रेसतर्फे धडक मोर्चा काढण्यात आला. दादर येथील जी उत्तर वॉर्डमध्ये मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला होता. या धडक मोर्चामध्ये वर्षा गायकवाड यांच्या सोबत मुंबई काँग्रेसचे स्थानिक नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  २४ वॉर्डांमध्ये काढण्यात आलेल्या धडक मोर्चामध्ये त्या त्या विभागातील काँग्रेसचे स्थानिक नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईतील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या मूलभूत सुविधा देणे हे मुंबई महानगरपालिकेचे काम आहे. पण त्याऐवजी फक्त मुंबई महानगरपालिकेचा निधी लुटण्याचे काम राज्यातील शिंदे फडणवीस सरकारकडून सुरू आहे आणि मुंबई महापालिकेच्या या निष्क्रिय आणि नियोजनशून्य कारभाराचा फटका सर्वसामान्य करदात्या मुंबईकरांना बसत आहे. प्रदूषणामध्ये तर लाहोरच्या नंतर मुंबईचा नंबर लागत आहे. इतकी बकाल अवस्था मुंबईची करून ठेवली. मुंबईत नालेसफाई झालेली नाही. इथल्या नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. अशुद्ध पाण्यामुळे आणि नालेसफाई न झाल्यामुळे मुंबईत डेंग्यू, मलेरिया, कॉलरा सारखे आजार पसरत आहेत.  या रोगांना मुंबईतील सर्वसामान्य मुंबईकर बळी पडत आहेत. या रोगांचा प्रतिकार करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सक्षम नाही. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे.  महापालिकेच्या या निष्क्रिय आणि नियोजनशून्य कारभाराचा निषेध करण्यासाठी व त्या विरोधात मुंबईकरांचा आवाज बनून लढण्यासाठी आम्ही मुंबईच्या २४ वॉर्डांमध्ये धडक मोर्चा काढला आहे आणि यापुढेही आम्ही मुंबईकरांच्या  हक्कासाठी आम्ही या भ्रष्ट महापालिकेविरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला.

वर्षा गायकवाड़  पुढे म्हणाल्या की, मुंबई महापालिका विसर्जित होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला असून देखील यांना निवडणुका नको. कारण या सरकारला ही चांगलेच माहिती आहे की त्यांचा पराभव निश्चित आहे. यांना लोकशाही मान्य नाही. यांना गाजवायची आहे एकाधिकारशाही आणि 'कब्जाराज'. त्यामुळेच यांच्या पालकमंत्र्यांनी घुसखोरी करून मुंबई महानगरपालिका मुख्यालयात दालनाचा ताबा घेतला आहे. यांना ना जनाची पर्वा आहे ना मनाची. यांच्या आणि महापालिका प्रशासकाच्या अनागोंदी कारभारामुळे मुंबईकरांनी कष्टाने कमावलेल्या पैशांची अक्षरशः उधळपट्टी सुरु आहे. सुशोभीकरणाच्या नावावर थातुरमातुर रंगरंगोटी आणि लाईट्स बसवून जनतेच्या पैशांची नासाडी केली जात आहे. मुंबईकरांना चांगल्या सुविधा पाहिजे, चांगले रस्ते पाहिजे, सर्वांना स्वच्छ पिण्याचे पाणी पाहिजे, परवडणारी घरे पाहिजे, सुलभ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पाहिजे, मोकळा श्वास घेता येईल असे हरित पट्टे हवेत. पण यांना याची काळजी कुठे? यांचे एकमेव लक्ष्य म्हणजे मुंबईकरांच्या खिशावर डल्ला मारणे, मुंबईचे महत्त्व कमी करणे. पण आम्ही तसे होऊ देणार नाही. या लोकविरोधी सरकारच्या आणि उदासीन प्रशासनाच्या लुटालुटीचे व भ्रष्टाचाराचे जाब मुंबईकर विचारणारच असे त्यांनी ठामपणे सांगितले.

सुमारे ५२ हजार करोड रुपयांचे बजेट असताना, एखाद्या राज्यापेक्षा मोठे बजेट असताना आणि आशियातील सर्वात मोठी महानगरपालिका असूनसुद्धा मुंबई महानगरपालिका मुंबईकर नागरिकांना त्यांच्या हक्काच्या मूलभूत सुविधा देऊ शकत नाही. करदात्या मुंबईकरांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि यासाठी मुंबई महापालिका व राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा जितका निषेध करावा तितका थोडाच आहे. मुंबईकरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. रस्त्यांवर खड्डे कि खड्ड्यांमध्ये रस्ता आहे असा कधी कधी प्रश्न पडतो. मुंबईमध्ये १ किलोमीटर लांबीचा देखील असा रस्ता नाही, जिथे खड्डे नाहीत. नाल्यांची सफाई झालेली नाही. ज्यामुळे यावर्षी देखील पावसामध्ये मुंबईची तुंबई झाली. कधी नव्हे ते चर्चगेट स्थानकाबाहेर आणि मरीन लाईन्स देखील पाण्याखाली गेले. पावसामध्ये अंधेरी सबवे पूर्णतः पाण्याखाली होता. खड्ड्यांसाठी व नालेसफाईसाठी करोडो रुपयांचा फंड मुंबई महापालिकेकडून खर्च केल्याचा दावा केला जातो, तरीसुध्दा नालेसफाई होत नाही, खड्डे दुरुस्त होत नाहीत. मग हा निधी जातो कुठे, असा सवाल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज उपस्थित केला.
 

Web Title: Mumbai Congress strike marches on municipal offices in 24 municipal wards of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.