कॅन्सरच्या उपचाराकरिता ऍक्सिस बँक १०० कोटी देणार
By संतोष आंधळे | Published: March 18, 2024 10:39 PM2024-03-18T22:39:51+5:302024-03-18T22:40:34+5:30
Mumbai Health News: कॅन्सर आजरावर अधिक चांगल्या पद्धतीने उपचार मिळावेत, यासाठी ऍक्सिस बँक नॅशनल कॅन्सर ग्रीडला १०० कोटीचा निधी देणार आहे. या ग्रीडच्या अंतर्गत देशातील ३०० पेक्षा अधिक कॅन्सर रुग्णालयांचा समावेश आहे.
- संतोष आंधळे
मुंबई - कॅन्सर आजरावर अधिक चांगल्या पद्धतीने उपचार मिळावेत, यासाठी ऍक्सिस बँक नॅशनल कॅन्सर ग्रीडला १०० कोटीचा निधी देणार आहे. या ग्रीडच्या अंतर्गत देशातील ३०० पेक्षा अधिक कॅन्सर रुग्णालयांचा समावेश आहे. येत्या पाच वर्षाच्या काळात कॅन्सर आजराच्या उपचारात अत्याधुनिक बदल करण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे.
या ग्रीडच्या समन्वयकाचे काम टाटा मेमोरिअल हॉस्पिटल तर्फे करण्यात येते. येत्या पॅकेज वर्षात काही प्रमुख प्रकल्पांवर काम करण्यात येणार आहे. त्यामध्ये नॅशनल ट्युमर बायोबँक, नॅशनल कॅन्सर टेलिकन्सल्टेशन नेटवर्क, आणि कॅन्सर निगडित इलेकट्रोनिक मेडिकल रेकॉर्ड या प्रकल्पांचा समावेश आहे. याचा अंतर्भाव केंद्र सरकारच्या आयुषमान भारत डिजिटल मिशन मध्ये करण्यात येणार आहे.
ऍक्सिस बँक आणि टाटा मेमोरियल सेंटर या दोघांमध्ये या कामासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यावेळी बँकेतर्फे उप व्यवस्थापकीय संचालक राजीव आनंद, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ सुदीप गुप्ता, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक आणि नॅशनल कॅन्सर ग्रिडचे निमंत्रक डॉ सी एस परमेश, कॅन्सर वैद्यक शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ मंजू सेनगर उपस्थित होते.
सामंजस्य करारावेळी आनंद यांनी सांगितले कि, " नॅशनल कॅन्सर ग्रिड आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल सोबत कॅन्सर संशोधन आणि कॅन्सर उपचार याकरिता भागीदारी करणे हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे."
या उपक्रमाबद्दल माहिती देताना डॉ परमेश म्हणाले, " आम्ही ॲक्सिस बँकेच्या योगदानाबद्दल आभारी आहोत. नॅशनल कॅन्सर ग्रिडवर कर्करोग संशोधन, नवकल्पना आणि डिजिटल आरोग्य उपक्रम चालवण्यासाठी त्यांचा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. देशभरातील कर्करोगाच्या रुग्णांना उच्च दर्जाची कर्करोग सेवा पुरवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे.