उत्तर मध्य मुंबईत ४ लाख मतांचे कडवे आव्हान काँग्रेसकडून मोडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 08:41 PM2024-06-04T20:41:41+5:302024-06-04T20:43:58+5:30

Mumbai North Central Lok Sabha Election Result 2024 : गेल्या दहा वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेसला उत्तर मध्य मुंबईत ४ लाख मतांचा आकडा मोडीत काढत स्वतःची मते वाढविण्यात काँग्रेस यशस्वी ठरले. 

mumbai north central lok sabha election result 2024 the tough challenge of 4 lakh votes was defeated by the congress maharashtra live result  | उत्तर मध्य मुंबईत ४ लाख मतांचे कडवे आव्हान काँग्रेसकडून मोडीत

उत्तर मध्य मुंबईत ४ लाख मतांचे कडवे आव्हान काँग्रेसकडून मोडीत

श्रीकांत जाधव, मुंबई : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ २०१४च्या मोदी लाटेत भाजपाच्या हाती गेला. तेव्हा विजयी उमेदवार पूनम महाजन यांना ४ लाख ७८ हजार ५३५ एवढे अधिकचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे येथे ४ लाख मतांचा आकडा पार करणे काँग्रेससाठी मोठे आव्हान होते. दरम्यान, गेल्या दहा वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेसला उत्तर मध्य मुंबईत ४ लाख मतांचा आकडा मोडीत काढत स्वतःची मते वाढविण्यात काँग्रेस यशस्वी ठरले. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीला समोर जाताना उत्तर मध्य मुंबईत काँग्रेससमोर भाजपा आणि शिंदे शिवसेनेत असलेल्या आमदाराच्या विधानसभेतील मताधिक्य तसेच विद्यमान भाजपा खासदार पूनम महाजन यांनी गाठलेला ४ लाख मतांचा आकडा पार करणे मोठे आव्हान होते.

यापूर्वी १९९९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार मनोहर जोशी यांनी बीबीएमचे उमेदवार राजा ढाले याचा पराभव करून ५५.८३ टक्के मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २००४च्या लोकसभा निवडणुकीत सेनेचे मनोहर जोशी यांचा पराभव करून काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी ४९. ८० मतांनी विजय मिळवला होता. 

पुढे २००९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त यांनी भाजपा उमेदवार महेश जेठमलानी यांचा पराभव करून ३ लाख १९ हजार ३५२ मते मिळवली होती. त्यानंतर मोदी लाटेत स्वार झालेल्या भाजपा उमेदवार पूनम महाजन यांनी ४ लाख ७८ हजार ५३५ मतांचे मताधिक्य मिळवत काँग्रेससमोर आव्हान उभे केले होते. पुढे २०१९च्या निवडणुकीत हे मताधिक्य वाढून ४ लाख ८६ हजार ६७२ मते पूनम महाजन यांना मिळाली होती. तेव्हा काँग्रेसला ३ लाख ५६ हजार ६६७ मते होती. 

परिणामी गेल्या १० वर्षापासून काँग्रेसची उत्तर मध्य मुंबईत घसरण सुरू होती. ४ लाख मतांचा पूनम महाजन यांचा जादुई आकडा मोडीत काढेल असा स्थानिक उमेदवार काँग्रेसकडे नव्हता. त्यामुळे काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्याला पक्षातील बड्या नेत्याचा विरोध झाला. मात्र सर्वांचा रोष आणि असहकार्य मिळूनही वर्षा गायकवाड यांनी ४ लाख मताधिक्य घेत पूनम महाजन यांनी उभे केले आव्हान मोडीस काढले.

Web Title: mumbai north central lok sabha election result 2024 the tough challenge of 4 lakh votes was defeated by the congress maharashtra live result 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.