मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकाल 2019: कीर्तिकरांची विजयी कीर्ती कायम; संजय निरुपमांचा पराजय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 08:22 PM2019-05-23T20:22:24+5:302019-05-23T20:24:53+5:30
गजानन कीर्तिकरांचा अडीच लाख मतांनी विजय
मुंबई: उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेनं सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांचा तब्बल अडीच लाखाहून अधिक मतांनी पराभव केला. कीर्तिकर यांना रात्री आठपर्यंत 5 लाख 53 हजार 846 मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावरील निरुपम यांच्या पारड्यात 3 लाख 1 हजार 133 मतं पडली.
गेल्या निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघात संजय निरुपम यांचा भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टींनी साडे चार लाख मतांनी दारुण पराभव केला. त्यामुळे यंदा निरुपम यांनी शेजारच्या मतदारसंघात धाव घेतली. त्यासाठी त्यांना मुंबईचं प्रदेशाध्यक्षपद सोडावं लागलं. 2009 मध्ये भाजपाचे वरिष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव करुन जायंट किलर ठरलेले निरुपम कीर्तिकर यांना कडवी टक्कर देतील असा अंदाज होता. मात्र कीर्तिकर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि त्यानंतर ती वाढवत नेली. त्यामुळे ही लढत कमालीची एकतर्फी झाली.
संजय निरुपमांनी मतदारसंघ बदलल्यानं ही शिवसेनेच्या आजी माजी नेत्यांमधील लढत होती. निरुपम शिवसेनेकडून दोनवेळा राज्यसभेवर गेले आहेत. दोपहर का सामना या शिवसेनेच्या मुखपत्राचं संपादकपददेखील त्यांनी भूषवलं आहे. मात्र त्यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत त्यांनी लोकसभा गाठली. मात्र 2014 च्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. तर त्याच निवडणुकीत मोदी लाटेमुळे गजानन कीर्तिकर निवडून आले.