"गैरसमजातून घोटाळ्याची तक्रार"; वायकरांना क्लीन चीट मिळाल्यानंतर काँग्रेस म्हणतं, "उमेदवार झाले तेव्हाच..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 11:04 AM2024-07-06T11:04:41+5:302024-07-06T11:29:05+5:30
Mp Ravindra Waikar : जोगेश्वरी जमीन घोटाळा प्रकरणात शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीला मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे.
Ravindra Waikar : शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट मिळाली आहे. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल केल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात सी समरी रिपोर्ट दाखल करण्यात आला. त्यानंतर रवींद्र वायकर यांच्या विरोधातील गुन्हे मागे घेतल्याचे वृत्त माध्यमांमधून समोर आलं आहे. यावरुन आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये सगळे स्वच्छ होत असल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली.
शिंदे गटात सामील झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांनंतर, मुंबई पोलिसांनी रवींद्र वायकर यांच्याविरुद्धचा खटला बंद केला. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर, त्यांची पत्नी मनीषा आणि शिंदे गटात सामील झालेल्या चार जवळच्या सहकाऱ्यांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यात काही महिन्यांनंतर क्लोजर रिपोर्ट दाखल केला. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दाखल केलेली तक्रार अपूर्ण माहिती आणि गैरसमजावर आधारित होती. त्यामुळे हे प्रकरण बंद करत असल्याचे कारण आर्थिक गुन्हे शाखेने दिलं आहे. महापालिकेसोबतच्या कराराचे उल्लंघन करून जोगेश्वरी येथे आलिशान हॉटेल बांधल्याप्रकरणी वायकर यांची चौकशी सुरू होती.
वायकर यांना मोठा दिलासा मिळाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला. "रवींद्र वायकर ज्यावेळी लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळीच त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिलं. मोदी सरकार ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून राजकारण करते. त्यांच्याकडे गेल्यावर वॉशिंग मशीनमध्ये धुतले जात असल्याचे आपण अनेकदा पाहिलं आहे. त्यामुळे ही चर्चा आता फार काही महत्त्वाची आहे असं मला वाटत नाही. नरेंद्र मोदी हे भ्रष्ट लोकांचे सरदार आहेत हे देशातील लोकांना कळलं आहे," अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
"जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन येईल ही त्यांची घोषणाच आहे. भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये कमलछाप पावडर टाकली तर तो माणूस धुवून, स्वच्छ होऊन बाहेर निघतो. यात काही नवीन आहे असं नाहीये. आरोप करायचे, त्यांना सोबत घ्यायचे आणि सगळी प्रकरणे संपवून टाकायची," असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, रवींद्र वायकर यांच्या विरोधात मुंबई महापालिकेने दिलेली तक्रार अपूर्ण माहितीच्या आधारे दिली गेल्याचे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने म्हटलं. त्यामुळे या प्रकरणात रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांना दिलासा मिळाला आहे.