Kerala Floods : मुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 19:21 IST2018-08-21T19:20:30+5:302018-08-21T19:21:55+5:30
Kerala Floods : केरळ राज्यात पूरपरिस्थितीमुळे मोठी जिवितहानी झाली आहे. तर मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे. लोकांचा निवारा नष्ट झाला असून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक नुकसानही झाले आहे. त्यामुळे जगभरातून केरळसाठी मदत पुरविण्यात येत आहे.

Kerala Floods : मुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला
मुंबई - केरळ राज्यात पूरपरिस्थितीमुळे मोठी जिवितहानी झाली आहे. तर मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे. लोकांचा निवारा नष्ट झाला असून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक नुकसानही झाले आहे. त्यामुळे जगभरातून केरळसाठी मदत पुरविण्यात येत आहे. तर युएईमधूनही केरळसाठी 700 कोटींची मदत पाठविण्यात आली आहे. देशातील प्रत्येकजण आपापल्यापरीने केरळसाठी पुढे येत आहे. आता, मुंबईचा डबेवालाही केरळवासियांच्या मदतीला धावून आला आहे.
मुंबईच्या डबेवाल्यांकडून नेहमीच सामाजिक भान जपले जाते. जागोजागी जाऊन भूकेल्यांच्या पोटात दोन घास भरवणारा मुंबईचा डबेवाला त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे साता-समुद्रापार पोहोचला आहे. त्यातूनच डबेवाल्यांकडून समाजाभिमूख कार्यातही सहभाग नोंदविण्यात येत आहे. यापूर्वी मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात डबेवाल्यांनी सहभाग नोंदवला होता. तर अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनातही त्यांनी आपला पाठिंबा दर्शवत सहभाग नोंदवला होता. आता, केरळच्या मदतीसाठी डबेवाला पुढे आला आहे.
या संकटकाळात केरळला मदतीची गरज आहे. पेपर ॲन्ड पार्सल व डबेवाल्यांची रोटी बँक यांच्या संयुक्ताने केरळमधील पुरग्रस्तांसाठी मदत पाठविण्यात येत असून एक हजार किलो तांदुळ व प्रथोमोपचारासाठी औषध-गोळ्या पाठवल्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली. सदरची मदत पेपर ॲन्ड पार्सलचे सर्वेसर्वा तिलक मेहता यांनी उपलब्ध करुन दिली आहे. कुरीअरच्या माध्यमातून हि मदत मंगळवारी लोअर परेल येथून केरळला पाठवली गेली. यावेळी पेपर अॅन्ड पार्सलचे तिलक मेहता, घनःश्याम पारेख मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर, विठ्ठल सावंत मुकादम कैलाश शिंदे मुकादम उपस्थित होते.
दरम्यान, केरळमधील जलप्रलयाला केंद्र सरकारने गंभीर आपत्ती म्हणून घोषित केले आहे. या महापुरामध्ये आजपर्यंत 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांत पावसाची तीव्रता कमी होणार आहे.