कोरोना काळातही मुंबईची गती, विकासाचा वेग मंदावला नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 08:09 AM2021-06-01T08:09:34+5:302021-06-01T08:11:25+5:30
मेट्रो मार्गिकांच्या चाचणीचा शुभारंभ, उड्डाणपुलांचे ई लोकार्पण
मुंबई : कोरोनाच्या लाटेत कडक निर्बंध असताना विकासाचा वेग मंदावला नाही. मुंबईला दिशा, वेग देणाऱ्या नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्षात उतरविण्यात आल्याने मेट्रोचे काम आखीव, रेखीव, देखणे झाले. कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही, परिणामी गाफील न राहता आयुष्याला ब्रेक लागणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
डहाणूकरवाडी ते आरे स्थानकादरम्यानच्या मेट्रो मार्गिकांच्या चाचणीचा शुभारंभ, पश्चिम द्रुतगती महामार्ग (टर्मिनल १ अणि २) येथील नियंत्रित प्रवेश भुयारी-उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन, राजणोली उड्डाणपूल मार्गिका आणि दुर्गाडी पुलाच्या दोन मार्गिकांचा ई लोकार्पण सोहळा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाचे सावट आहे. मात्र, उपचारांच्या सुविधा निर्माण करतानाच महानगरांच्या विकासाचा वेग कमी होऊ दिला नाही. मुंबई वाढतेय तसा तिच्या विकासाचा वेगही कायम राखत आहोत. आदित्य ठाकरे म्हणाले, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी नियोजन केले आहे. महामार्गावर डिझाइन्स, हिरवळ तयार करून त्याचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. महामार्गावरील दहिसर ते माहिमपर्यंत चालत जाण्याची सोय करण्याचे नियोजित आहे.
हेरिटेज ट्री संकल्पना राबवणार - उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात एका दिवसात ३० किमी लांबीचा डांबरी रस्ता तयार करण्याचे काम झाले असून, त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. मुंबईतही रात्रीच्या बारा तासांत सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम हाती घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. वादळात झाडे उन्मळून पडल्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी माझी भेट घेतली. चर्चेनुसार हेरिटेज ट्री ही संकल्पना राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
- मेट्रो चाचणीवेळी साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मार्गांवर आता मेट्रोची चाचणी घेण्यात येणार असून, या चाचणीचा उद्घाटन सोहळा सोमवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आकुर्ली मेट्रो स्थानकावर पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्र्यांचा लवाजमा आणि बाकीची मंडळीही होती. साहजिकच आकुर्ली मेट्रो स्थानकावर साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र हाेते. उपस्थितांनी मास्क परिधान केले असले तरी प्रत्यक्षात मात्र ‘दो गज की दुरी’ कुठेच दिसत नव्हती.
परिणामी या सोहळ्यातील गर्दीवर सर्वच स्तरातून विशेषत: समाजमाध्यमांहून टीका झाली. किती ही गर्दी. सरकारी सोहळा म्हणून काय झाले. मुख्यमंत्री, मंत्री आहेत म्हणून कोरोना निर्बंध नाही पाळणार? लग्नाला ५० लोक नाही चालत. मग मेट्रोच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी कशी? असे अनेक सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केले.
- मुंबई विमानतळावर पोहोचणे सहज शक्य
एमएमआरडीए अनुक्रमे टी १ आणि टी २ जोडण्यासाठी अंडरपास व एलिव्हेटेड रस्ते तयार करणार असून, या कामाचे सोमवारी भूमिपूजन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए)च्या टर्मिनल १ (टी १) आणि टर्मिनल २ (टी २)ला जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) एलिव्हेटेड रस्ता आणि वाहनांचा अंडरपास तयार करणार असल्याने लवकरच एक नवी कनेक्टिव्हिटी मिळेल.
हे दोन प्रकल्प मुंबई विमानतळाकडे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (डब्ल्यू ई एच)वरून प्रवेश/ एक्झिट पॉईंट सुधारण्यासाठी आहेत.
टी १ ला जोडण्यासाठी एमएमआरडीए ७६ कोटी रुपये खर्चून डब्ल्यू ई एचवर प्रवेश नियंत्रणासाठी वाहने अंडरपास (१ पातळी) व उड्डाणपूल रुंदीकरण करणार आहे.
सीएसएमआयएच्या डब्ल्यू ई एच ते टी १ पर्यंत वांद्रे येथून सुलभ प्रवेशासाठी नियंत्रित अंडरपास प्रस्तावित आहे. येथील कामामुळे वाहतुकीची कोंडी कमी होईल, तर जुहू - विलेपार्ले उड्डाण पुलासाठी दहिसर व वांद्रे दिशेने प्रत्येकी एक लेन रुंदीकरणे प्रस्तावित असून, या उड्डाणपुलाची क्षमता वाढविण्यास मदत होईल.