उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार; हायकोर्टानं बजावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 09:12 AM2022-12-08T09:12:46+5:302022-12-08T09:13:05+5:30
राज्यभरातील सर्व मुख्य रस्त्यांवर पडलेले खड्डे व उघडे मॅनहोल्सबाबत उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
मुंबई : उघडे मॅनहोल्स झाकण्यासाठी मुंबई महापालिका करत असलेल्या कामाचे कौतुक आहे. मात्र, काम पूर्ण होईपर्यंत उघड्या मॅनहोल्समुळे काही अनुचित प्रकार घडल्यास महापालिका जबाबदार राहील, असे स्पष्ट प्रतिपादन उच्च न्यायालयाने बुधवारी केले. शहरातील उघड्या मॅनहोल्सबाबत मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अभय आहुजा यांनी चिंता व्यक्त करत पालिकेला या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश दिले.
राज्यभरातील सर्व मुख्य रस्त्यांवर पडलेले खड्डे व उघडे मॅनहोल्सबाबत उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. उघडे मॅनहोल्स झाकण्यासाठी मुंबई पालिका युद्धपातळीवर काम करत आहे, अशी माहिती महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी दिली. ‘तुम्ही काम करत आहात, हे चांगले आहे; पण तोपर्यंत काही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही पालिकेला जबाबदार धरणार. उघड्या मॅनहोल्समध्ये एखादी व्यक्ती पडली तर काय?’ असे न्यायालयाने म्हटले.
आधुनिक तंत्रज्ञान वापरा
उच्च न्यायालयाने महापालिकेला अधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना केली. ज्यावेळी मॅनहोलवरील झाकण काढले जाईल, त्याच क्षणी संबंधित अधिकारी सतर्क होतील, अशी काही तरी सोय करा. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या अधुनिक काळात आपण अन्य कोणताही वेगळा विचार करू शकत नाही. मॅनहोल्सच्या झाकणाला हात लावल्यावर तत्काळ समजेल, असे काही डिव्हाइस का बनवू शकत नाही? झाकणाला हात लावल्यावर ‘बिप’ तुमच्या कार्यालयात ऐकायला येईल. तुम्ही सेन्सॉरप्रमाणे काही तरी बनवा,’ अशी सूचना उच्च न्यायालयाने पालिकेला केली. याचिकेवरील पुढील सुनावणी ९ डिसेंबर रोजी आहे.
२९ ऑगस्ट २०१७ रोजी पावसामुळे यकृतविकार तज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांना त्यांच्या घरापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या उघड्या मॅनहोलमध्ये पडून जीव गमवावा लागला होता. डॉ. अमरापूरकर हे घराकडे निघाले होते. ड्रायव्हर त्यांची गाडी चालवीत होता. एलफिस्टन रोडवर पोहोचल्यावर त्याची कार पाण्यात अडकली. त्यानंतर त्यांनी चालत घरी जाण्याचा निर्णय घेतला.
ड्रायव्हरला कारजवळच थांबवून ते निघाले. मात्र घरी पोहोचलेच नाहीत. दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह वरळी समुद्रकिनाऱ्यावर सापडला.