आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल, नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 10:00 AM2021-06-03T10:00:15+5:302021-06-03T10:00:53+5:30
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल, अशी घोषणाची नाना पटोले यांनी केली केली आहे. राज्यात काँग्रेस सध्या चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे; परंतु २०२४ मध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला
मुंबई - राज्यात पहिल्यांदाच तीन प्रमुख पक्ष एकत्र येऊ महाविकास आघाडीचं सरकार बनलंय. भाजपा नेत्यांकडून सातत्याने हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, लवकरच पडणार अशी टीका केली जात आहे. मात्र, कोरोना विरुद्धच्या लढाईचा सामना करत सरकार काम करत आहे. पण, अनेकदा या सरकारमध्ये मतभेद दिसून येत आहेत. त्यामुळे, आगामी निवडणुका जागावाटप करुन एकत्रच लढतील का, हा मोठा प्रश्न आहे. त्यातच, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल, अशी घोषणाची नाना पटोले यांनी केली केली आहे. राज्यात काँग्रेस सध्या चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे; परंतु २०२४ मध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. सकाळ वृत्तसंस्थेशी बोलताना नानांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडी सरकार हे केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आलं आहे. तेही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी किमान समान कार्यक्रमाची आखणी केल्यानंतर सरकार स्थापन झाले. त्यामुळे, आगामी काळात सरकारच्या योजना जनतेला पाहायला मिळतील, असेही नाना पटोले यांनी सांगितले आहे.
नाना पटोले यांनी देशातील कोरोना, मोदी सरकारचा कार्यकाळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद, महाविकास आघाडी सरकार, शेतकरी आणि किमान समान कार्यक्रमासंदर्भातही चर्चा केली. यावेळी, कोरोनाच्या परिस्थितीला मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. कोरोना हा देशाला आर्थिक डबघाईला आणणारा आजार आहे, हे सर्वात आधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले होते. या आजाराला गांभीर्याने घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता. मात्र भाजपच्या काही लोकांनी त्यांना समाजमाध्यमांवर वेड्यात काढले. आता परिस्थिती आपण पाहातच आहोत, असे म्हणत कोरोनावर बोलताना नानांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.