Nana Patole: आता काँग्रेसही ठिकठिकाणी 'भोंगे' वाजवणार, नाना पटोलेंनी सांगितलं काय वाचणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 03:25 PM2022-04-19T15:25:46+5:302022-04-19T15:40:58+5:30
राज ठाकरे यांनी आपण आगामी ५ जून रोजी आपण अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली.
मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या सभेनंतर राज्यात मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. अगदी, गृहमंत्र्यांपासून ते बड्या राजकीय नेत्यांपर्यंत सर्वचजण याबाबत चर्चा करत आहेत. राज ठाकरेंच्या निशाण्यावर नसलेल्या काँग्रेसनेही भोंग्याच्या वादात उडी घेतली आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचं आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या सभांवर बंदी घाला, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. आता, काँग्रेसच ठिकठिकाणी भोंगे वाजवणार असल्याचं नाना पटोलेंनी जाहीर केलं आहे.
राज ठाकरे यांनी आपण आगामी ५ जून रोजी आपण अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. तसेच १ मे म्हणजेच महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये मनसेची जाहीर सभा होणार असल्याचीही माहिती दिली. या घोषणेनंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी टीका केली. राज ठाकरे भाजपाची सुपारी घेऊन भाषण करत आहेत. धार्मिक आस्थेचा बाऊ करणं चुकीचं. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचं आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या सभांवर बंदी घाला, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. त्यानंतर, आता काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी भोंगे वाजवणार असल्याची घोषणाच त्यांनी ट्विटरवरुन केली आहे. म्हणजे केंद्र सरकारविरोधात राज्यात काँग्रेस भोंगा बजाव आंदोलन करत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मोदींच्या 'अच्छे दिना'चे पाढे काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी भोंग्यांवर वाचणार! pic.twitter.com/bx5Wede1lu
— Nana Patole (@NANA_PATOLE) April 19, 2022
मोदींच्या 'अच्छे दिना'चे पाढे काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी भोंग्यांवर वाचणार!, असे ट्विट नाना पटोलेंनी केले आहे. त्यामुळे, आधीच वादात असलेल्या मुद्द्यात सत्ताधारी पक्षानेही उडी घेतल्याने राजकीय वर्तुळात याचीही चर्चा तर होणारच... असे दिसून येत आहे.
राज ठाकरेंचा 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम
राज ठाकरेंनी रविवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याचा विषय काढला. देशभरातल्या नागरिकांना माझं एवढंच सांगणं आहे की, भोंग्याचा विषय धार्मिक नाही, सामाजिक आहे. भोंग्यामुळे फक्त हिंदुना नाही, तर मुस्लिमांनाही त्रास होतोय. त्यामुळे ३ तारखेपर्यंत आम्ही शांत बसू आणि नंतर जशास तसं उत्तर देऊ, असा इशाराच राज ठाकरेंनी दिला. "आमचा मुस्लिमांच्या प्रार्थनेला काहीच विरोध नाही. आमचा विरोध भोंग्याला आहे. मला देशातली शांतता भंग करायची नाही. मुस्लिमांनीही माणुसकीच्या नजरेने पाहावे. त्यांनी प्रार्थना कराव्या, पण लाउडस्पीकरवरुन ते ऐकवणार असलीत, तर त्यांनाही आमच्या आरत्या ऐकाव्या लागतील," असेही राज ठाकरे म्हणाले.