Maharashtra Politics: “शेतकरी, कामगारांना उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव, काँग्रेसकडून हिताचे रक्षण”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 06:23 PM2023-03-01T18:23:36+5:302023-03-01T18:25:14+5:30
Maharashtra News: केंद्रातील भाजप सरकारने कामगार व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: कामगार व शेतकरी ही मोठी शक्ती असून काँग्रेस सरकारने त्यांच्या हिताचे नेहमीच रक्षण केले आहे. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरु यांच्यापासून डॉ. मनमोहन सिंह यांच्या सरकारपर्यंत काँग्रेसने कामगार हिताचे विविध कायदे केले व त्यांना त्यांचे हक्क दिले. कामगार व शेतकरी या दोन घटकांचे देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान आहे पण केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कामगार व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून त्यांना उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार कामगारांच्या हातातील काम हिरावून घेत आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणारे, शेतीत काम करणारे, घरगुती काम करणारे अशा विविध क्षेत्रातील असंघटीत कामगारांनी एकत्र येऊन एक शक्ती उभी करा व तुमच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करा. काँग्रेस पक्षाच्या सरकारांनीच कामगारांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात, हक्क मिळावेत यासाठी कायदे केले पण भाजपा सरकारने नवीन कामगार कायदे आणून कामगारांचे हक्कही हिरावून घेतले. कामगार शक्ती वाचवायची असेल तर असंघटीत क्षेत्रातील ताकद एकत्र करा व काँग्रेस पक्षाला पुन्हा विजयी करुन सत्तेत आणा, असे आवाहन पटोले यांनी केले.
पण २०१४ पासून हे चित्र बदलले आहे
देशात औद्योगिक क्षेत्रात कामगारांचा मोठा वाटा आहे. एकवेळ संघटीत कामगारांची संख्या देशात १३ टक्के एवढी होती पण ती आता घटली असून केवळ ६ टक्केच राहिली आहे. भविष्यात ही संख्याही कमी होण्याची शक्यताच जास्त आहे. त्यामुळे असंघटीत क्षेत्रातील कामगारांची संख्या ९६ टक्के झाली आहे. काँग्रेस सरकारने कामगारांसाठी विविध योजना आणल्या, सामाजिक सुरक्षा, निवृत्ती वेतन, विमा यासह आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या पण २०१४ पासून हे चित्र बदलले आहे. कामगारांचे हक्क आता त्यांना मिळत नाहीत. बदलत्या परिस्थितीनुसार बदलले पाहिजे. सोशल मीडियाचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. आपले मत सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवता येते, असे डॉ, उदित राज म्हणाले.
दरम्यान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व कामगार नेते भाई जगताप यावेळी म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच कामगारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलो आहोत. कामगार शक्ती मोठी शक्ती असून असंघटीत क्षेत्रातील कामगारांची संख्या पाहता या क्षेत्रात काम करण्यास मोठा वाव आहे. कामगारांपर्यंत जा, त्यांच्या समस्या जाणून घ्या व त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. केंद्रातील मोदी सरकारच्या कामगार धोरणांमुळे कामगारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे, कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, हे कामगार क्षेत्रासाठी योग्य नाही. कामगार शक्ती एकत्र करा व संघर्ष करा काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी कायम उभा आहे असे भाई जगताप म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"