Nana Patole on LPG Hike: “विश्वगुरु मोदींच्या कृपेने देशात जगातील सर्वांत जास्त महाग LPG चा विक्रम”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 05:04 PM2022-04-13T17:04:44+5:302022-04-13T17:07:16+5:30

Nana Patole on LPG Hike: भारताला महासत्ता बनवण्याचे दिवास्वप्न दाखवले, पण ना अच्छे दिन आले ना देश महासत्ता बनला, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

nana patole said record of the world most expensive lpg in the country by the grace of vishwaguru | Nana Patole on LPG Hike: “विश्वगुरु मोदींच्या कृपेने देशात जगातील सर्वांत जास्त महाग LPG चा विक्रम”: नाना पटोले

Nana Patole on LPG Hike: “विश्वगुरु मोदींच्या कृपेने देशात जगातील सर्वांत जास्त महाग LPG चा विक्रम”: नाना पटोले

Next

मुंबई: विश्वगुरुची उपाधी घेऊन मिरवणारे नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कृपेने भारत जगात एका बाबतीत पहिल्या नंबरवर केला आहे. महासत्तेचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदींनी एलपीजी गॅसची (LPG) किंमत जगात सर्वांत जास्त भारतात करून एका वेगळाच विक्रम स्थापित केला आहे, अशी उपरोधिक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

महागाईच्या प्रश्नावर मोदी सरकारचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, देशात सध्या एलपीजी गॅस सिलिंडरसाठी एक हजार रुपये मोजावे लागतात तर व्यवसायासाठी लागणाऱ्या सिलिंडरसाठी तब्बल २२५० रुपये मोजावे लागतात. भारतात पेट्रोलची किंमत जगाच्या तुलनेत तिसऱ्या नंबरवर आहे तर डिझेल ८ व्या नंबरवर आहे. दरडोई उत्पन्नाची तुलना करता भारतातील नागरिकाला त्याच्या उत्पन्नातील २८ टक्के रक्कम इंधनावर खर्च करावी लागते. पेट्रोल डिझेल, गॅसच्या किमती प्रचंड वाढल्याने त्याचा भार सामान्य जनतेच्या बजेटवर पडत आहे. विकसीत देशाची तुलना करता भारतीय नागरिकाला इंधनाच्या खर्चापोटी जास्त खर्च करावा लागतो, असे नाना पटोले म्हणाले.  

चुकीच्या धोरणांमुळे सामान्य जनतेला इंधन महागाईचे चटके

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सामान्य जनतेला इंधन महागाईचे हे चटके बसत आहेत. अच्छे दिन आयेंगे म्हणत भारताला महासत्ता बनवण्याचे दिवास्वप्न दाखवले पण ना तर अच्छे दिन आले ना भारत महासत्ता बनला. महागाईच्या बाबतीत मात्र देशाला आघाडीवर नेऊन ठेवले आहे. आज पुन्हा एकदा सीएनजी ५ रुपये तर व पीएनजी ४.५० रुपयांनी वाढवले आहेत. डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील युपीएचे सरकार असताना हाच एलपीजी गॅस ४१० रुपयांना येत होता तर पेट्रोल ७२ रुपये लिटर होते. महागाईची झळ सामान्य जनतेला बसू नये यासाठी युपीए सरकार नेहमी तत्पर असे पण मोदी सरकारच्या काळात मात्र जनतेपेक्षा उद्योगपती मित्रांच्या हिताची जास्त काळजी केली जाते, असा दावा नाना पटोले यांनी केला.  

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमती सातत्याने कमी

मोदी सरकारच्या ८ वर्षांच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमती सातत्याने कमी झाल्या. या किमती १८ डॉलर प्रती बॅरलपर्यंत खाली आल्या होत्या. क्रूड ऑईलचा आठ वर्षातील सरासरी दर काढला तर तो ६० डॉलर प्रती बॅरल एवढा आहे. परंतु मोदी सरकारने इंधनावर कर वाढवून लुट केली. युपीएच्या काळात २०१४ पर्यंत पेट्रोलवर ९.४८ रुपये तर डिझेलवर ३.५६ रुपये कर होता. रोड इन्फ्रॉस्ट्रक्चर कर १ रुपये होता. मोदी सरकारच्या काळात पेट्रोलवर ३२.९० रुपये, डिझेलवर ३१.८० रुपये व रोड टॅक्स १८ रुपये, कृषी सेस २ रुपये व ४.५० रुपये पेट्रोल व डिझेलवर लावला जात आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले. 

दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर लावून मोदी सरकारने २६ लाख कोटी रुपये सामान्य माणसाच्या खिशातून ओरबाडून घेतले आहेत. महागाईचा प्रश्न फक्त इंधनापुरताच मर्यादित नाही तर सिमेंट, लोखंड, वीटासुद्धा महाग झाल्या आहेत, ८१० औषधांच्या किमती १० टक्क्यांनी वाढवलेल्या आहेत. महागाईचा दर ६.९५ टक्के झाला असून पुढच्या वर्षापर्यंत तो १० टक्क्यापर्यंत जाईल पण हे सरकार आकडे लपवून ठेवत आहे. महागाईच्या झळा जनतेला बसत आहेत, सामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे म्हणूनच हिंदू-मुस्लीम दंगे, धार्मिक मुद्द्यांचा आधार मोदी सरकारकडून घेतला जात आहे, असेही पटोले म्हणाले.
 

Web Title: nana patole said record of the world most expensive lpg in the country by the grace of vishwaguru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.