Narayan Rane: हे आमचं दुर्दैव! अजित पवारांच्या 'त्या' विधानानंतर नारायण राणेंचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 04:07 PM2022-05-03T16:07:16+5:302022-05-03T16:07:55+5:30
राज ठाकरेंच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह महाविकास आघाडीच्या नेते त्यांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत.
मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी १ मे रोजी झालेल्या औरंगाबादच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार हे त्यांना जे सोयीचे आहे तेच वाचतात. जेम्स लेन आणि दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांचा संबंध दाखवून मराठा समाजाची माथी भडकविण्याचे काम शरद पवारांनी केल्याची टिका राज यांनी केली. तसेच, 4 तारखेनंतर मशिदींवरील भोंग्याबाबत ऐकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. राज यांच्या या टिकेनंतर राष्ट्रवादीकडून पलटवार करण्यात येत आहे. भोंग्यावरील मुद्द्यावरुन अजित पवारांनीशिर्डीचं उदाहरण देत राज ठाकरेंना लक्ष्य केलं. त्यावर, आता केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी थेट इशाराच दिला आहे.
राज ठाकरेंच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह महाविकास आघाडीच्या नेते त्यांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज राज ठाकरेंवर निशाणा साधत त्यांच्यावर पलटवार केला. विविध राजकीय नेत्यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडविणाऱ्या राज ठाकरेंचीच नक्कल करत आता अजित पवारांनी केली. तसेच, मशिदींवरील भोंग्याबाबत बोलताना, शिर्डीतील साई मंदिराचं उदाहरण दिलं. शिर्डी साई मंदिरात पहाटे 4 वाजता काकडा आरती होते. जर, मशिदींवरील भोंगे बंद केले, तर साई मंदिरातील आरतीही बंद करावी लागेल, असे अजित पवार यांनी म्हटले होते. अजित पवारांच्या या विधानाला आता केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी ट्विटवरवरुन थेट इशाराच दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार जी म्हणाले आहेत, की शिर्डी मंदिरावरचा भोंगाही उतरवावा लागेल. हिंदू मंदिरावरील भोंगे, हरिनाम सप्ताह, जागरण-गोंधळ, काकड आरती यांवर कारवाई करून दाखवाच. अशी कारवाई करणारा पहिला हिंदू असेल, हे आमचे दुर्दैव!
— Narayan Rane (@MeNarayanRane) May 3, 2022
उपमुख्यमंत्री अजित पवार जी म्हणाले की, शिर्डी मंदिरावरचा भोंगाही उतरवावा लागेल. हिंदू मंदिरावरील भोंगे, हरिनाम सप्ताह, जागरण-गोंधळ, काकड आरती यांवर कारवाई करून दाखवाच. अशी कारवाई करणारा पहिला हिंदू असेल, हे आमचे दुर्दैव!, असे म्हणत एकप्रकारे थेट इशाराच दिला आहे. त्यामुळे, उद्यापासून भोंग्याबाबत होणाऱ्या वादात राणेंची भूमिका काय असणार हे पाहावे लागेल.