नरेंद्र मोदी व अमित शाह खोटारड्यांचे सरदार, मल्लिकार्जुन खर्गेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 06:37 PM2019-12-28T18:37:25+5:302019-12-28T18:38:40+5:30
संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
मुंबई : प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये, दरवर्षी दोन कोटी युवकांना नोक-या देण्याच्या खोट्या घोषणा करणारे, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या मुद्द्यावर खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह खोटारड्यांचे सरदार आहेत अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.
काँग्रेसच्या १३५ व्या स्थापना दिनानिमित्त जिथे काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली होती त्या ऐतिहासिक गोकुळदास तेजपाल हॉल येथे मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट क्रांती मैदानातील गांधी स्मृती स्तंभाला अभिवादन करून लोकशाही व संविधानविरोधी केंद्रातील भाजप सरकारविरोधात ‘भारत बचाओ - संविधान बचाओ’ फ्लॅग मार्च काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक या फ्लॅग मार्चमध्ये सहभागी झाले होते.
विल्सन कॉलेजजवळ या फ्लॅग मार्चचे सभेत रूपांतर झाले. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना खर्गे यांनी केंद्र सरकारवर चौफेर टीका केली, ते म्हणाले की, मुंबई शहरातून काँग्रेसची स्थापना झाली. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाची सुरुवात याच मुंबईतून झाली काँग्रेसने संघर्ष करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संविधान तयार झाले.
काँग्रेस सरकारांनी या संविधानाच्या मार्गाने चालून देशात लोकशाही रूजवली व वाढवली. संविधानाने सर्वांना समानतेचा हक्क दिला आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशा-यावर चालणा-या भाजप सरकारने संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी व एनपीआर ही त्या प्रक्रियेचा भाग आहेत. संविधानाला पायदळी तुडवून देशात धार्मिक फूट पाडण्याचा व अराजकता पसरवण्याचा प्रयत्न मोदी शाह करत आहेत. त्यांना चले जावो सांगण्यासाठीच भारत बचाओ संविधान बचाओ फ्लॅग मार्च काढला आहे, असे खर्गे म्हणाले.
या सभेला मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यावर काँग्रेसने सर्व जाती धर्माच्या गरिब श्रीमंत अशा समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वांना समान संधी, न्याय व व्यक्तीस्वातंत्र्य दिले. संविधानाने जनतेला दिलेले अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न भाजपचे केंद्र सरकार करत आहे. पण त्यांचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. मोदी शाह यांच्या हुकुमशाहीतून देशाला मुक्त करण्यासाठी काँग्रेसने नवस्वातंत्र्य लढा उभारला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.
यावेळी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. नितीन राऊत, आ. यशोमती ठाकूर, आ.डॉ. विश्वजीत कदम, मुझफ्फर हुसेन, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आ. अमित देशमुख, वर्षाताई गायकवाड, आशिष दुआ, बी.एम. संदीप, सोनल पटेल, खा. हुसेन दलवाई, कुमार केतकर, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, नसीम खान, बाबा सिद्दिकी, आ. भाई जगताप, प्रणिती शिंदे, अस्लम शेख, अमिन पटेल, झिशान सिद्दिकी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, सचिन सावंत, प्रवक्ते राजू वाघमारे यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी या सभेचे सूत्रसंचालन केले.