नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 11:38 AM2024-11-22T11:38:27+5:302024-11-22T11:41:09+5:30
मुंबई पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्या मोबाइलमध्ये नसीम खान यांच्याबाबत आक्षेपार्ह चॅट आढळून आले आहेत.
मुंबई
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानानंतर आता निकालाचे वेध लागले आहेत. यातच काँग्रेस नेते नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली आढळल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह चॅट आढळून आले आहेत. यानंतर नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणामुळे आधीच गदारोळ उडालेला असताना आता नसीम खान यांच्याबाबत पोलिसांना काही संशयास्पद मोबाइल चॅट्स आढळून आल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार नसीम खान यांच्या कार्यालयात दोन संशयित व्यक्ती आढळून आले. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांपैकी एकाने पवईच्या हिरानंदानी भागात एका काँग्रेस कार्यकर्त्याकडेच नसीम खान यांच्याबाबत विचारणा केली. नसीम खान यांची संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर दोन्ही संशयित आरोपी थेट नसीम खान यांच्या कार्यालयात पोहोचले. त्यातील एकाने नसीम खान यांच्या सुरक्षारक्षकाकडे विचारणा केली आणि खान यांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली. नसीम खान यांच्यापर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करत होते आणि त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कार्यकर्त्यांनीच दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर दोघांच्या मोबाइल चॅटमध्ये नसीम खान यांच्याबाबत आक्षेपार्ह चॅट्स आढळून आले. पोलीस दोघांचीही कसून चौकशी करत आहेत.
नसीम खान हे मुंबईतील काँग्रेसचा एक जुनाजाणता चेहरा आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे ते कार्यकारी अध्यक्ष असून ते माजी मंत्री राहिलेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा केवळ ४०७ मतांनी पराभव झाला होता. यावेळी ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असून चांदिवलीमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. यातच या घटनेनंतर चांदिवली मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.