Nashik Graduate Constituency Election:...तर सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवरून 'मविआ'त उडू शकतो खटका; कारण, शिवसेनेचं ठरलंय!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 04:01 PM2023-01-16T16:01:07+5:302023-01-16T16:03:55+5:30
राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. पण, नाशिक मतदार संघातील उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे, यावरुन आता महाविकास आघाडीत खटका उडण्याची शक्यता आहे. नाशिक मतदार संघातून अगोदर काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण, ऐनवेळेला काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, तर सुधीर तांबे यांनी अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे या उमेदवारीवरुन महाविकास आघाडीमध्ये खटका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक विभाग मतदार संघातून आता सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज अपक्ष भरण्यात आला आहे. तांबे यांनी सर्व पक्षांना मदत करण्यासाठी आवाहन करणार असल्याचे म्हटले आहे, तर दुसरीकडे शिवसेनेच्या शुभांगी पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेन पाटील यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे, शुभांगी पाटील या गेल्या काही काळापासून नॉट रिचेबल होत्या त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते.
सत्यजीत तांबे यांना निलंबित करणार?; काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष
काँग्रेसमधील एका गटाने सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या गटाने तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे सुधीर तांबे यांनी ऐनवेळी अर्ज न भरल्यामुळे तांबे यांच्याविरोधात काँग्रेसने कारवाई करत रविवारी त्यांचे निलंबन केले आहे.
नाशिकच्या उमेदवारीवरुन महाविकास आघाडीमध्ये खटके उडण्याची शक्यता आहे. आज शिवसेना ठाकरे गटातील एक गटाने शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. तर काँग्रेसमधील एका गटाने सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याचे म्हटले आहे. त्यामुळे ममहाविकास आघाडीमध्ये नाशिक मतदारसंघासाठी एकमत झाले नसल्याचे बोलले जात आहे, या मुद्द्यावरुनच आता महाविकास आघाडीमध्ये खटके उडू शकतात असं राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत पुन्हा ट्विस्ट
नाशिक पदवीधरची जागा कोण लढवणार यावर अद्यापही मविआत गोंधळ सुरू आहे. त्यात नाशिकमध्ये अपक्ष म्हणून फॉर्म भरलेल्या शुभांगी पाटील यांनी ठाकरेंची भेट घेत ठाकरेंचा पाठिंबा असल्याचं सांगितले होते. परंतु अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शुभांगी पाटील नॉट रिचेबल असल्याचं समोर आले आहे. तर महाविकास आघाडीचा पाठिंबा मलाच मिळेल. शुभांगी पाटील यांना अधिकृतपणे ठाकरे गटाचा पाठिंबा मिळाला नाही असा दावा नाशिकचे दुसरे अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांनी केला आहे. सुभाष जंगले यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जंगले हे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत.
सत्यजीत तांबे यांना निलंबित करणार?
सत्यजीत तांबे यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. सत्यजीत तांबे यांना विधानपरिषद निवडणुकीत पाठिंबा देऊन विषय संपवावा, असं काँग्रेसमधील एका गटाचे मत आहे. तर सत्यजीत तांबेंवर निलंबनाची कारवाई करावी, अशी एका गटाची मागणी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठी याबाबत काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.