‘राष्ट्रवादी’ दादांचीच; शरद पवारांना आज दुपारपर्यंत पक्षाचे नाव सूचवावं लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 07:27 AM2024-02-07T07:27:13+5:302024-02-07T07:27:35+5:30
निवडणूक आयोगाचा निकाल; शरद पवार यांना मोठा धक्का; अजित पवार यांच्या गटाला पक्ष अन् चिन्ह दाेन्ही मिळाले
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने मंगळवारी घेतला. तसेच पक्षाचे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला देण्यात आले आहे. या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यासंदर्भातील याचिकेवर काही चाचण्यांनंतर निर्णय घेतला. पक्षाच्या घटनेतील उद्दिष्टांची केलेली तपासणी, पक्षाची घटना, पक्षामध्ये संघटना तसेच विधिमंडळ पक्षपातळीवर नक्की कोणत्या गटाकडे बहुमत आहे, याची पडताळणी केल्याचे आयोगाने म्हटले.
निवडणूक आयोगाच्या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे, असे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत!
- अजित पवार,
अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
आयोगाने काय म्हटले?
पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत. अजित पवारांचा गट हीच खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस. ५ आमदार
व एका खासदाराने दोन्ही बाजूंनी पत्र दिले.
अजित पवार गट
nमहाराष्ट्रातील ४१ आमदार
nनागालँडचे ७, झारखंडचे १ आमदार
nलोकसभेचे २ खासदार
nविधान परिषदेतील ५ आमदार
nराज्यसभेचा १ खासदार
शरद पवार यांच्यापुढे कोणते पर्याय?
निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे.
नव्या पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करणे.
आज दुपारपर्यंत पक्षाचे नाव सूचवा
आपल्या राजकीय गटाला कोणते नाव व चिन्ह द्यावे, यासाठी प्रस्ताव सादर करण्याची मुभा निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिली. बुधवारी दुपारपर्यंत शरद पवार गटाने तीन नावांचे पर्याय सादर करावे, असे आदेश आयोगाने दिले.
शरद पवार गट
nमहाराष्ट्रातील १५ आमदार
nकेरळमधील १ आमदार
nलोकसभेचे ४ खासदार
nविधानपरिषदेचे ४ आमदार
nराज्यसभेचे ३ खासदार