ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी एनसीबीने कंगनाचीही चौकशी करावी - काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 02:09 AM2020-09-25T02:09:48+5:302020-09-25T02:10:09+5:30

भाजपचे बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन, सँडलवूड आणि गोवा प्रकरणाकडे एनसीबीला दुर्लक्ष करू देणार नाही.

NCB should also probe Kangana in drug connection case: Congress | ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी एनसीबीने कंगनाचीही चौकशी करावी - काँग्रेस

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी एनसीबीने कंगनाचीही चौकशी करावी - काँग्रेस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : व्हॉट्सअ‍ॅपवरील संभाषणाच्या आधारे बॉलिवूडमधील काहींना केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, आपण ड्रग्ज घेत होतो, अशी कबुली देणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतला चौकशीसाठी बोलावण्यात आले नाही. कंगनाचा ड्रग घेतल्यासंदर्भातील व्हिडीओ हा पुरावा आहे, असे असताना तिची चौकशी का केली जात नाही? यंत्रणा कंगनावर इतकी मेहरबान का? असे प्रश्न काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी उपस्थित केले. तसेच तिच्या चौकशीची मागणी केली.


भाजपचे बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन, सँडलवूड आणि गोवा प्रकरणाकडे एनसीबीला दुर्लक्ष करू देणार नाही. एका ५९ ग्रॅम गांजाप्रकरणी एनसीबी एवढा मोठा गाजावाजा करीत असताना याच वेळी कर्नाटकमध्ये भाजपचा कार्यकर्ता चंद्रकांत चौहानला १२०० किलो गांजासह अटक करण्यात आली याकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. कर्नाटकात अभिनेत्री रागिनी द्विवेदीला सँडलवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली. अभिनेत्री रागिनी ही कर्नाटक भाजपची स्टार प्रचारक होती. याच प्रकरणात १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आदित्य अल्वा या व्यक्तीलाही अटक केली. अल्वा हा गुजरात भाजपचा स्टार प्रचारक अभिनेता विवेक ओबेरॉयचा सख्खा मेहुणा आहे. विवेक ओबेरॉय हा मोदी बायोपिकचा निर्माता संदीप सिंहबरोबर सहनिर्माता आहे. पंतप्रधान मोदींची मुख्य भूमिकाही विवेकनेच साकारली आहे.


याच संदीप सिंहने भाजप कार्यालयात ५३ वेळा फोन कोणाला केले होते? आणि संदीप सिंहला मॉरिशसमध्ये एका प्रकरणात कोणी मदत केली होती? याचा खुलासा अद्याप झालेला नाही. हे सर्व एकमेकाशी संबंधित आहे. महाराष्ट्र सरकारने या संबंधांची माहिती सीबीआयला दिली आहे. तरीही आजपर्यंत त्यादृष्टीने तपास का केला नाही, असा सवाल सावंत यांनी केला.

Web Title: NCB should also probe Kangana in drug connection case: Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.