NCP आमदार अपात्रता प्रकरण; निकालाविरोधात अजितदादा हायकोर्टात, शरद पवार गटाचे टेन्शन वाढले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 22:05 IST2024-02-20T22:05:03+5:302024-02-20T22:05:19+5:30
NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group News: राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात अजित पवार गटाने हायकोर्टात धाव घेतली.

NCP आमदार अपात्रता प्रकरण; निकालाविरोधात अजितदादा हायकोर्टात, शरद पवार गटाचे टेन्शन वाढले!
NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group News:राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झालीच नसल्याचा दावा करत शरद पवार गटाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यास अजित पवार गटाने केलेल्या विरोधावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला. तसेच तीन आठवड्यानंतर मार्च महिन्यात होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' हे नाव कायम राहील, असे स्पष्ट करत, शरद पवार गटाला एका आठवड्यात पक्षाचे चिन्ह बहाल करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले. मात्र, यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
पक्षाची घटना, रचना आणि विधिमंडळातील संख्याबळ या त्रिसुत्रीच्या आधारावर अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरतो, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद पक्षातील फूट नाही. त्यामुळे दहाव्या परिशिष्टानुसार आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले होते. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाविरोधात अजित पवार गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
राहुल नार्वेकर यांच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र न केल्याप्रकरणी अजित पवार गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांची अतिशय महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर ही बैठक झाल्याचे समजते.
दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी असाच निकाल दिला होता. शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचाच असल्याचे सांगत, शिंदे गट आणि ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करण्यात आले नव्हते. यानंतर राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात शिवसेना शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.