मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राष्ट्रवादीची उडी; अजित पवारांनी घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 01:35 PM2019-05-13T13:35:20+5:302019-05-13T13:36:38+5:30
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी सकाळी या विद्यार्थ्यांची भेट घेतली.
मुंबई - वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी सकाळी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद केलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे. या विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळण्याचा हक्क फडणवीस सरकारला कोणी दिला? असा सवाल यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
या मुलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असून त्यासाठी आजच राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आश्वासनही अजित पवार यांनी आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांना दिले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचं सरकार असूनही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही, हे या सरकारचं अपयश आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच विद्यार्थ्यांना फटका बसलाय. मग हे फडणवीस सरकार की, फसणवीस सरकार? अशी टीका त्यांनी सरकारवर केली.
दरम्यान, मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आझाद मैदानावर आंदोलन छेडलंय. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. जर मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा देखील इशारा वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून देण्यात आलाय. यंदाच्या शैक्षणिक वर्षात दंत वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. याच मुद्द्यावरून मराठा समाजातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलंय.
तर, वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार न्याय देणार आहे. २०० पैकी १०० विद्यार्थ्यांना मेरिटनुसार ओपन मधून प्रवेश मिळू शकेल. तर उर्वरीत १०० विद्यार्थ्यांसाठी कोटा वाढवून मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारला पत्र पाठवलं आहे. त्यामुळे सरकार या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला होता.
रविवारी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची मुंबई येथे बैठक पार पडली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये राखीव २१३ जागांवरील प्रवेशही रद्द झाल्यामुळे मराठा समाजामध्ये नाराजी पसरली आहे. या बैठकीमध्ये या मराठा डॉक्टर्स विद्यार्थ्यांच्या मागे पूर्ण मराठा समाज ताकदीनिशी उभे राहण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले.