“शरद पवार आमच्यासाठी दैवत, त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही”: अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 04:49 PM2022-06-24T16:49:19+5:302022-06-24T16:54:38+5:30
महाराष्ट्रावर जी काही संकटे आली, त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. यातच आता महाविकास आघाडी सरकार टिकावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादींचे बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आमचे दैवत आहेत. त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
आधी अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मागे भाजपचा हात असल्याचे दिसत नाही, असा दावा केला होता. नंतर अवघ्या काही वेळातच स्वतः शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अजित पवार यांचा दावा खोडून काढला. इतकेच नव्हे तर, एकनाथ शिंदे यांच्या एका व्हिडिओवर प्रतिक्रिया देत राष्ट्रीय पक्षांची यादीच वाचून दाखवली आणि यामागे भाजप असल्याचे अप्रत्यक्षरित्या ठणकावून सांगितले. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एकदा अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असे स्पष्टीकरण दिले.
महाविकास आघाडीकडे बहुमत आहे
डखोर आमदार अजूनही शिवसेनेचे आहेत, मुख्यमंत्रीही शिवसेनेचे आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीकडे बहुमत आहे, त्यामुळे राज्य सरकारला कोणताही धोका नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आम्ही सगळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठिशी असून, सांयाकाळी त्यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. राष्ट्रीय विषयावर काही भाष्य करणार नाही असेही अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुढील रणनीती ठरवली जाईल. विधीमंडळाबाबत काही निर्णय असतील तर ते अध्यक्ष घेतील, असे अजित पवारांनी सांगितले.
एनडीएचे सरकार सत्तेत असताना २५ पक्ष सोबत होते
एनडीएचे सरकार सत्तेत असताना २५ पक्ष सोबत होते, त्यानंतर यूपीएचे सरकारही अनेक पक्षांनी मिळून बनले होते. महाराष्ट्राच्या संदर्भात काही असेल तर बोलतो, बाकीचा राष्ट्रीय विषय असेल तर ते पवारसाहेब, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल बोलतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रावर जी काही संकटे आली, त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून, उद्धव ठाकरेंचा समावेश टॉपच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश होता. त्यामुळे या काळात महाविकास आघाडीने चांगले काम केले आहे, असे त्यांनी नमूद केले.