Maharashtra Politics: “आशिष शेलारांच्या मताशी सहमत, संजय राऊतांना...”; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 03:59 PM2023-03-01T15:59:18+5:302023-03-01T16:00:43+5:30
Maharashtra News: काहीही बोलणे योग्य नाही. पण शहानिशा केली पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात जोरदार घमासान झालेले पाहायला मिळाले. शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे सदस्य आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यातच विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांचे समर्थन करत स्पष्ट शब्दांत संजय राऊतांनी केलेल्या विधानावर भाष्य केले.
संसदेत पक्षनेतेपदावरुन काढून टाकण्यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, टाकू द्या. बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट. चोरांचे मंडळ आहे, विधिमंडळ नाही चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरुन काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. अशी अनेक पदे आम्हाला पक्षाने, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली. जी आम्ही ओवाळून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही. पदे गेली तरी परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली. यानंतर विधिमंडळात शिंदे गट आणि भाजपने आक्रमक भूमिका घेतली. विधानसभेत झालेल्या गदारोळानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
आशिष शेलार यांच्या मताशी सहमत
आपण सर्व विधिमंडळाचे सदस्य आहोत. कोणी कोणत्याही पक्षातून निवडून येऊ द्या. कोणत्याही नेत्याला, व्यक्तीला चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाही. टीव्हीवर एक बातमी आली आहे. एका व्यक्तीने विधिमंडळाला चोरमंडळ म्हटले. शेलार यांच्या मताशी सहमत आहे. पक्षीय गोष्टी बाजूला ठेवून काही गोष्टी पाळल्या पाहिजे. संविधानाने बोलण्याचा अधिकार दिला. पण काहीही बोलणे योग्य नाही. जे बोलले ते खरोखरच बोलले आहे का? त्यात तथ्य आहे का? जे बोलले त्यांची बाजू घेत नाही. पण शहानिशा केली पाहिजे. कारण नसताना एखाद्या व्यक्तीला टार्गेट करता कामा नये. पण ती व्यक्ती तशी बोलली असेल तर कोणत्याही पक्षाची असो कोणत्याही पदावरील असो त्यांना समज दिली पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, कुणीही असो विधिमंडळ सर्वोच्च सभागृह आहे. थोर परंपरा असलेले सभागृह आहे. त्याचा अभिमान सर्वांना आहे. खरेच तसे म्हटले की नाही ते तपासून पाहिले पाहिजे. सध्याच्या काळात शब्दांचा वापर दोन्ही बाजूने होतो. चोरमंडळ म्हणणे योग्य नाही. तसेच विरोधी पक्षातील सदस्यांना देशद्रोही म्हणणे योग्य नाही. शब्दांचा वापर सर्वांनीच योग्य पद्धतीने केले पाहिजे. चोर मंडळ म्हणणे आम्हाला मान्य नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"