राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या इंदू मिलच्या जागेची पाहणी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 12:18 PM2020-01-20T12:18:03+5:302020-01-20T12:19:42+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नुकताच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखडयाची पाहणी केली होती
मुंबई - दादर येथील इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखड्याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे मंगळवार दिनांक २१ जानेवारी रोजी सायंकाळी ३.३० वाजता करणार आहेत. त्यांच्यासमवेत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सत्तेत येताच अनेक महत्वाच्या कामांना गती देण्याचे काम सुरू केले असून त्यामध्ये इंदू मिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नुकताच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखडयाची पाहणी केली होती आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन येत्या दोन वर्षांत इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याचे जाहीर केले होते. त्याचवेळी अजित पवार यांनी या जागेची पाहणी शरद पवार करणार असल्याचे जाहीर केले होते.
काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची 350 फूट इतकी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वी या पुतळ्याची उंची 250 फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा 100 फूट व पुतळा 350 फूट अशी स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून 450 फूट इतकी होणार आहे.
त्याचसोबत पुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे व लोखंडाचे प्रमाण वाढेल तसेच पुतळ्याच्या पायाची देखील वाढ होईल. या स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरविण्याची सोय असेल. तसेच पादपीठामध्ये 6.0 मीटर रुंदीचे चक्राकार मार्ग असतील. या स्मारकामध्ये 68 टक्के जागेत खुली हरित जागा असेल. या ठिकाणी 400 लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग व कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह असेल. तसेच 1000 लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल.