ठाकरे पितापुत्र भेटीत नेमकी काय चर्चा झाली? अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 08:14 PM2023-07-19T20:14:31+5:302023-07-19T20:15:58+5:30
Ajit Pawar And Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती अजित पवार यांनी दिली.
Ajit Pawar And Uddhav Thackeray: शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडून दोन गट झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेचा ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार विरोधकांच्या बैठकीला बंगळुरू येथे गेले होते. तर शिवसेना शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार सत्ताधारी एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले होते. दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर ठाकरे आणि अजितदादांची ही पहिलीच भेट आहे. या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती अजित पवार यांनी दिली.
ठाकरे पितापुत्र भेटीत नेमकी काय चर्चा झाली?
अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे आणि माझे चांगले संबंध आहेत. मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर फोनवरुन त्यांनी माझे अभिनंदनही केले होते. राजकीय संबंध वेगळे आणि कौटुंबिक वेगळे. आम्ही सोबत काम केले आहे, एकमेकांचा बांध कधी रेटला नाही, त्यामुळे आमच्यात दुश्मन नाही. आता माझी भूमिका वेगळी आहे, त्यांची वेगळी आहे. त्यामुळे या आमच्या भेटीत नेहमीची चर्चा झाली, त्यात काही राजकीय चर्चा नव्हती, असे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, चांगले काम करा, राज्यासाठी चांगले काम करावे. सध्या जी काही साठमारी सुरु आहे, त्यामुळे राज्यातील प्रश्न पावसामुळे आता पाणी भरत आहे, या साठमारीमुळे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. अजित पवारांनी अडीज वर्षे माझ्यासोबत काम केलेले आहे. त्यामुळे मला त्यांचा स्वभाव माहिती आहे. बाकीच्यांचे सत्तेसाठी डावपेच सुरु असले तरी त्यांच्यामुळे लोकांना वेळेवर मदत मिळेल. कारण त्यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा दिल्या गेल्या आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.