राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०१५नंतर निवडणुकाच झाल्या नाही; अपात्रता सुनावणीत तटकरेंचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 07:53 AM2024-01-26T07:53:50+5:302024-01-26T07:54:01+5:30
पक्षात गट नाही, एकच राष्ट्रवादी पक्ष
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता सुनावणीत पक्षाअंतर्गत निवडणुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी उलट तपासणीत २०१५ नंतर पक्षाअंतर्गत निवडणुकाच झाल्या नसल्याचा दावा केला. २०१५ मध्ये राज्य प्रतिनिधींनी प्रदेशाध्यक्ष म्हणून मला निवडून दिले होते, मात्र त्यानंतर निवडणुकाच झालेल्या नाहीत हे सांगतानाच पक्षात काेणताही गट नाही तर एकच राष्ट्रवादी असल्याचे सांगत पक्षात फूट पडल्याचे त्यांनी नाकारले.
राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर उलटतपासणी सुरू असून शरद पवार गटाच्या आमदार जितेंद्र आव्हाड, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उलटतपासणीनंतर गुरुवारी अजित पवार गटाचे नेते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची उलटतपासणी घेतली. शरद पवार गटाचे वकील रेहान जगतियानी यांनी उलटतपासणीत तटकरे यांना प्रश्न विचारले. २१ जूनला झालेली राष्ट्रवादीची बैठक आणि अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आलेली प्रक्रिया यावर वकिलांकडून बोट ठेवण्यात आले.
२१ जून रोजी झालेल्या बैठकीत शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष होते. अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष नेमके कधी करण्याचे ठरले? तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी कधी निवड झाली? याविषयीची बैठक कधी झाली? व कोणत्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला असे प्रश्न वकिलांनी उपस्थित केले. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी सरकारच्या काळात १४ मंत्री होते त्यापैकी ९ मंत्री अजित पवार गटाचे होते हे माहीत होते का, असाही सवाल केला. यावर राष्ट्रवादीत कोणतेही गटतट नाही अजित पवार यांची बहुमताने निवड झाली होती. २०१५ साली आपण प्रदेशाध्यक्षपदी निवडून आलो, त्यानंतर निवडणूक झाली नाही, असे तटकरे म्हणाले.
शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांची उपस्थिती
राष्ट्रवादीच्या सुनावणीवेळी पहिल्यांदाच शरद पवार हे उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे, रोहित पवार, सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती उपस्थित होते.
२०१९ मध्ये शपथविधीसाठी पक्षनेतृत्वाची परवानगी
२०१९ मध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा भाजप-राष्ट्रवादीची युती झाली होती का, तसेच याला पक्षनेतृत्व आणि इतर पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा होता का, या प्रश्नावर तटकरे यांनी या शपथविधीला पक्षनेतृत्वाचा पाठिंबा होता, असे सांगितले. त्यानंतर त्यांना शपथविधीसाठी कशी मान्यता देण्यात आली, या प्रश्नावर मात्र तटकरे यांनी सांगता येणार नाही, असे उत्तर दिले.