दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष नाहीय, पाटलांची तक्रार; मात्र अजितदादांच्या विधानानं सभागृहात हशा!
By मुकेश चव्हाण | Published: August 3, 2023 02:08 PM2023-08-03T14:08:41+5:302023-08-03T14:25:40+5:30
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन करत कौतुक केले.
मुंबई: अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील समीकरणे बदलली. उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान झाले. त्यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर सभागृहात विजय वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देखील विजय वडेट्टीवार यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन करत कौतुक केले. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, विरोधीपक्षनेत्याचं महत्व एवढं आहे की, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात मागून येणाऱ्या आमदारांकडे लक्ष देण्याऐवजी भाषणाकडे जास्त लक्ष द्यायला हवं. यावर लगेच देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, आमचं लक्ष इकडेच आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर आमचं दोघांचं लक्ष तुमच्याकडे आहे, मात्र तुमचचं आमच्याकडे लक्ष नाही, त्याला आम्ही काय करु, असा उपरोधिक टोला अजित पवारांनी लगावला. अजित पवारांच्या या विधानावरुन जयंत पाटलांसह सभागृहातील सर्व आमदार खळखळून हसू लागले. तसेच मुख्यमंत्री सभागृहातील भाषण लक्ष देऊन ऐकताय. मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री लक्ष देण्यास तयार नाही. मुख्यमंत्र्यांनी आता ठरवलं पाहिजे की, नंबर वन उपमुख्यमंत्री कोण आणि नंबर टू उपमुख्यमंत्री कोण?, अजितदादांनी यावर देखील लगेच प्रत्युत्तर दिलं. नंबर वन हे (फडणवीस) आणि नंबर टू मी...यानंतर सभागृहात एकच हसा पिकला.
वडेट्टीवारांचे सरकारकडून अभिनंदन- मुख्यमंत्री शिंदे
विजय वडेट्टीवारांचे सरकारकडून अभिनंदन, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. वडेट्टीवार विदर्भातील नेते आणि आमचे उपमुख्यमंत्रीदेखील विदर्भातले आहेत. विदर्भाच्या पाण्याला वेगळा गुण असतो. त्यामुळे राज्याच्या इतिहासात ४ विदर्भाचे मुख्यमंत्री मिळाले. विदर्भाला देशातील राष्ट्रपती मिळाले. पाहुणचार करण्यात विदर्भाचा हातभार कुणी धरू शकत नाही असं कौतुक शिंदेंनी केले. विदर्भातील जेवणही कडक असते. तसाच स्वभाव विदर्भातील लोकांमध्ये आहे. विजय वडेट्टीवार यांच्यावर थोडा अन्याय झाला आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच त्यांना या जागेवर बसवायला हवं होते. अधिवेशन विना विरोधी पक्षनेता होईल असं वाटत होते. परंतु वडेट्टीवार ही कसर भरून काढतील, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.