खरंच भाजपाला शरद पवारांनी दिली होती 'ऑफर'?; राष्ट्रवादीकडून आली प्रतिक्रिया...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 06:06 PM2020-06-24T18:06:31+5:302020-06-24T18:29:28+5:30
मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावर आपलं मत व्यत्क केलं आहे.
मुंबई: राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीनंतर झालेला सत्तासंघर्ष मोठ्या प्रमाणात गाजला होता. राज्यात राजकारणात गेल्या नोव्हेंबर महिन्यात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या, अनेक वर्षाचे मित्र शत्रू बनले तर शत्रूच्या गोटात सहभागी होऊन मित्राला धडा शिकवला. शिवसेना-भाजपा यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन संघर्ष झाला आणि हे दोन्ही पक्ष एकमेकांपासून दुरावले. याबाबत द इनसाइडर या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीबाबत अनेक गौप्यस्फोट केले होते.
दोन वर्षापूर्वी एक स्थिती अशी होती की राष्ट्रवादी आणि भाजप सोबत यायचं असा निर्णय झाला, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसेच राष्ट्रवादी आणि भाजप जर सोबत येणार असेल तर शिवसेनेला बरोबर घ्यावं लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट सांगितलं होतं. जर एकत्र जायचं असेल आणि काँग्रेसला बाजूला ठेवायचं असेल तर शिवसेना आम्हाला सोबत लागेल. शिवसेनेशिवाय आम्ही तुम्हाला घेत नाही, असा निरोप गृहमंत्री अमित शाहांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिला होता, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही पहिल्यांदाच प्रतिक्रिया आली आहे.
मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावर आपलं मत व्यत्क केलं आहे. जयंत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुलाखतीत काय म्हणाले याचं विश्लेषण केलं जाईल. तसेच मला वाटत नाही की त्यांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितले.
तत्पूर्वी, निवडणुकीनंतर ज्यावेळी शिवसेना येत नाही असं लक्षात आलं, तेव्हा आमच्याकडे कोणते पर्याय आहे याचा आम्ही विचार केला. त्यातल्या एका पर्यायात आम्हाला सोबत जाण्यासाठी थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. थेट राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार नाही. थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. याबाबत योग्य त्या चर्चाही झाल्या होत्या. त्यातील एका चर्चेत मी होतो. एका चर्चेत मी नव्हतो, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
एकदम टोकाच्या चर्चा झाल्या होत्या. ज्या चर्चा व्हायला हव्या त्या झाल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी आपली भूमिका बदलली आम्ही कॉर्नर झालो. दोन-तीन दिवस शांत बसलो, कुठलीच कृती केली नाही, पण दोन-तीन दिवसांनी अजितदादांकडून आम्हाला पर्याय आला, शरद पवार जे आधी म्हणाले, स्थिर सरकार भाजपा-राष्ट्रवादीच देऊ शकते, तीन पक्षाचं सरकार बनवणं मला मान्य नाही म्हणाले, मी सरकार बनवायला तयार आहे सांगत त्यांच्याकडे स्ट्रेंथही होती असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखती दरम्यान केला होता.
अन्य महत्वाच्या बातम्या-
"जरा तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल"; राष्ट्रवादीचा पडळकरांना थेट इशारा
"भाजपा आमदारांच्या अंगावर गेलात तर..."; पडळकरांच्या विधानावरून वाद चिघळला
भाजपा नेत्यांनी घेतली पडळकरांची 'शाळा'; पवारांवरील वादग्रस्त विधानाबद्दल खेचले कान
मोदींच्या महत्त्वाच्या मोहिमेत अमेरिकेची आडकाठी; 'टेक ऑफ'साठी घातल्या अटी
CoronaVirus News: रामदेव बाबांच्या 'कोरोनिल' औषधावर ठाकरे सरकारने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...