राष्ट्रवादी आमदारांचा सरासरी १७ लाख खर्च; भाजप, काँग्रेसचे आमदार दुसऱ्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 04:20 AM2019-08-21T04:20:58+5:302019-08-21T04:25:01+5:30
महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक वॉच (एडीआर) या संस्थांनी आमदारांच्या खर्चाचे विश्लेषण केले आहे.
- योगेश बिडवई
मुंबई : पक्षनिहाय विविध आमदारांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला सादर केलेल्या खर्चाचा तपशील पाहिल्यानंतर भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांचा सरासरी खर्च सर्वाधिक असल्याचे आढळले आहे. त्यानंतर भाजप व काँग्रेसचे आमदार दुस-या तर शिवसेनेचे आमदार तिस-या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक वॉच (एडीआर) या संस्थांनी आमदारांच्या खर्चाचे विश्लेषण केले आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आयोगाने प्रत्येक उमेदवाराला २८ लाख रूपये खर्च करण्याची मर्यादा घातली होती. आमदारांनी आयोगाला सादर केलेल्या खर्चानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४१ आमदारांनी एकूण खर्च मर्यादेच्या सरासरी ६४ टक्के म्हणजे प्रत्येकी १७ लाख ७७ हजार ९१९ रुपये खर्च केले. त्यानंतर भाजपच्या १२२ आमदारांनी सरासरी १५ लाख ३२ हजार ९८१ रुपये तर काँग्रेसच्या ४२ आमदारांनी सरासरी १५ लाख २५ हजार ५१६ रुपये म्हणजेच दोन्ही पक्षांनी एकूण मर्यादेच्या सरासरी ५५ टक्के रक्कम खर्च केली. शिवसेनेच्या ६३ आमदारांच्या खर्चाची सरासरी १३ लाख ४२ हजार ४४२ रुपये अर्थात ४८ टक्के आहे.
२८८ आमदारांनी सादर केलेल्या तपशीलावरून त्यांचा सरासरी खर्च १५ लाख १८ हजार १३३ रुपये म्हणजे ५४ टक्के आहे. यावरून विधानसभा निवडणुकीत २८८ आमदारांनी एकूण ४३ कोटी ७२ लाख २२ हजार ३०४ रुपये खर्च केल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाला कळविले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा एक आमदार निवडूण आला आहे. त्याने सादर केलेला खर्च २२ लाख ८३ हजार २८४ म्हणजे सर्वाधिक ८२ टक्के आहे. एमआयएमच्या २ आमदारांचा सरासरी खर्च सर्वांत कमी २३ टक्के अर्थात ६ लाख ३६ हजार ८३४ रुपये आहे.
आमदारांच्या खर्चाची पक्षनिहाय सरासरी
(खर्च मर्यादा : प्रत्येकी २८ लाख)
पक्ष आमदार सरासरी निवडणूक खर्च
खर्च (रू.) (टक्के)
भाजप १२२ १५,३२,९८१ ५५
शिवसेना ६३ १३,४२,४४२ ४८
काँग्रेस ४२ १५,२५,५१६ ५५
राष्ट्रवादी ४१ १७,७७,९१९ ६४
अपक्ष ०७ १७,३५,९२९ ६२
शेकाप ०३ ११,७७,६५७ ४२
बहुजन विकास आघाडी ०३ १३,०६,०३३ ४७
एमआयएम ०२ ६,३६,८३४ २३
भाकप (मार्क्सवादी) ०१ ८,६५,७४५ ३१
मनसे ०१ ११,८७,३०४ ४२
भारिप बहुजन महासंघ ०१ १८,२०,७१० ६५
समाजवादी पार्टी ०१ १६,२५,००० ५८
राष्ट्रीय समाज पक्ष ०१ २२,८३,२८४ ८२
एकूण २८८ १५,१८,१३३ ५४
निवडणूक खर्चात समाविष्ट बाबी : सभा- प्रचारफेरी, दृकश्राव्य व मुद्रित माध्यमात दिलेल्या जाहिराती, प्रचारात सहभागी कार्यकर्त्यांवर केलेला खर्च, प्रचारसाहित्य तसेच वाहनांवरील खर्च.