'लपूणवीस-छपूणवीस केलेला प्रकार उघडणवीस आला', राष्ट्रवादीचं देवेंद्रांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 09:07 PM2019-11-29T21:07:28+5:302019-11-29T21:07:34+5:30
सत्ता गमावल्यामुळे भाजपाने महाविकास आघाडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात बिनसल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीची घरोबा करत सरकार स्थापन केलं. त्यामुळे राज्यात सर्वाधिक जास्त जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. त्यामुळे भाजपाकडून आणि विशेषत: देवेंद्र फडणवीसांकडून ठाकरे सरकारला लक्ष्य केलं जात आहे. मात्र, फडणवीसांच्या आज केलेल्या टीकेला राष्ट्रवादीकडून उत्तर देण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंची पाठराखण केलीय.
सत्ता गमावल्यामुळे भाजपाने महाविकास आघाडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा शपथविधी सोहळा पार पडताच दुसऱ्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी किमान समान कार्यक्रमावर टीका केली. त्यानंतर आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात की, कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली. मग बहुमताचे दावे कशासाठी? या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. फडणवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उत्तर देण्यात आलंय.
''लाखो लोकांसमोर शिवतीर्थावर उघड-उघड शपथ घेतलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्र्यांबाबत फडणवीसांनी ‘लपून-छपून’ हा शब्दप्रयोग दोनदा वापरलाय. हा हास्यास्पद प्रकार त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर केलाय. रात्रीच्या अंधारात लपून-छपून कारवाया करत औट घटकेच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या फडणवीसांना लपून-छपून हा शब्द भयंकर आवडलाय बहुतेक. जिथं फुलं वेचली तिथं गोवऱ्या वेचायची वेळ त्यांच्यावर आलीय. तीही स्वतःच्या कर्मानं. तरीही पीळ गेलेला दिसत नाही. फडणवीसांनी २०१४ च्या प्रतिज्ञापत्रातही लपूणवीस-छपूणवीस केलेला प्रकार उघडणवीस झाला आहे. कोर्टाचं समन्स त्यांना बहुधा मिळालेलं असावं. त्यामुळे कुणापासून सावध राहावं याचा उलगडा महाराष्ट्राच्या जनतेला झाला आहे.'', असे म्हणत फडणवीसांना राष्ट्रवादीनं लक्ष्य केलंय.
तसेच, मा. मु. देवेंद्रजींनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या बहुमताची काळजी करू नये. स्वतःचेच भूतकाळातले नस्ते उद्योग आयुष्यात ॲक्सिस करायला लागलेत. त्याचा विचार करून गुमान राहून द्यावं, असंही राष्ट्रवादीनं म्हटलंय.
दरम्यान, फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका करताना, नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? स्वत:च्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का? अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का? असे प्रश्न विचारले आहेत. तसेच, भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का? असा प्रश्नांचा भडीमार करत महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे असा घणाघात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. एकंदरीत सरकार स्थापन होताच, ट्विटर आणि फेसबुकवरुन सरकार आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगल्यांच दिसतंय.