शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, 'सत्तास्थापना सध्याच शक्य नाही!'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 09:50 PM2019-11-15T21:50:04+5:302019-11-15T21:58:05+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना किमान समान कार्यक्रम या मुद्यावर एकत्र येत असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबई: राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरु आहे. मात्र तिन्ही पक्षाची विचारधारा भिन्न असल्याने सरकार कसे स्थापन करणार याबाबत सध्या चर्चा रंगू लागली आहे. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना किमान समान कार्यक्रम या मुद्यावर एकत्र येत असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्या तरी सरकार स्थापन करणं शक्य नसून थोडा वेळ लागणार असल्याचे सांगितले आहे. तसेच सरकार 5 वर्ष टिकेल याच दृष्टीकोनातून चर्चा होत असल्याचे देखील शरद पवारांनी यावेळी सांगितले.
'भाजपा नं. १... आमच्याशिवाय सरकार बनू शकणार नाही'; चंद्रकांतदादांचाही इरादा पक्का
शरद पवार म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष आहेत. सरकार चालवताना या मुद्द्यावर आम्ही कायम राहू. मुस्लिम आरक्षणासंदर्भात कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये चर्चा करू. सरकार केव्हा स्थापन होईल ते सांगू शकत नाही. परंतु मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. पाच वर्षे स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न असेल. येणारे सरकार तकलादू नसेल. महिला मुख्यमंत्रीसंदर्भात काहीच विचार नाही. शिवसेना, काँग्रेस वगळता इतर कुणाशीही चर्चा करणार सुरु नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
'महाशिवआघाडी'वर अमोल कोल्हेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. तसेच तिन्ही पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रमाबाबतही एकमत झाले आहे. किमान समान कार्यक्रमामधील करारानुसार शिवसेनेला संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपद मिळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 14 मंत्रिपदे मिळतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 14 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.