महायुतीत राष्ट्रवादीचा राहू शकतो ‘या’ जागांसाठी आग्रह

By यदू जोशी | Published: February 7, 2024 06:34 AM2024-02-07T06:34:40+5:302024-02-07T06:37:11+5:30

काही जागांबाबत वादाची शक्यता I बोलणीसाठी बैठकीची अद्याप प्रतीक्षाच

NCP's insistence for 'these' seats can remain in the Grand Alliance | महायुतीत राष्ट्रवादीचा राहू शकतो ‘या’ जागांसाठी आग्रह

महायुतीत राष्ट्रवादीचा राहू शकतो ‘या’ जागांसाठी आग्रह

यदु जोशी

मुंबई : महायुतीतील तीन पक्षांची लोकसभेच्या जागा वाटपासाठी अद्याप एकही बैठक झालेली नसताना राष्ट्रवादी काँग्रेसने विविध मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण सुरू केले आहे. उद्या महायुतीची चर्चा होत असताना कोणत्या जागांचा विशेष आग्रह धरायचा याची रणनीती पक्षाचे ज्येष्ठ नेते सध्या आखत आहेत.

महाराष्ट्रात सुनील तटकरे हे एकच लोकसभा सदस्य अजित पवार यांच्यासोबत आहेत. तर सुप्रिया सुळे (बारामती), श्रीनिवास पाटील (सातारा), डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) हे तीन खासदार शरद पवार यांच्यासोबत आहेत. पक्ष शरद पवार की अजित पवार यांच्यासोबत यांचा फैसला करणारी निवडणूक म्हणूनही राष्ट्रवादीच्या दृष्टीने लोकसभा महत्त्वाची आहे. अजित पवार गटाचा ज्या जागांसाठी आग्रह असेल असे मानले जाते त्यातील काही जागांवर भाजप-शिवसेना या मित्रांचाही दावा असेल. त्यामुळे त्या जागा आपल्याकडे खेचून आणताना राष्ट्रवादी काँग्रेसचा  कस लागेल.

रायगड, बारामती आणि...
nकोकणात रायगडची जागा अर्थातच राष्ट्रवादीच्या वाट्याला जाईल. तेथे याच पक्षाचे सुनील तटकरे खासदार आहेत. शिवसेनेकडूनही या जागेची मागणी केली जाईल, पण जागा राष्ट्रवादीकडे जाईल, असे म्हटले जाते.
n‘माझ्या विचारांचा खासदार तुम्ही बारामतीतून निवडून द्या’ असे आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना अलीकडेच केले आहे. त्या ठिकाणी पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार असतील, अशी जोरदार चर्चा आहे.
nपश्चिम महाराष्ट्रात शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. बारामतीबरोबरच शिरुरच्या जागेसाठी राष्ट्रवादी अडून बसेल. सोबतच सातारची जागाही प्रतिष्ठेची केली जाण्याची शक्यता आहे. 

सशक्त उमेदवारांची चाचपणी 
महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू होईल तेव्हा अमुकच जागा का हव्यात, तेथे कोणते सशक्त उमेदवार आपल्याकडे आहेत याची मांडणी राष्ट्रवादीकडून केली जाणार असून, त्यासाठीची तयारी सध्या सुरू आहे.

मराठवाड्यातदोन जागा
nमराठवाड्यातील धाराशिव व परभणी या दोन जागा मिळाव्यात यासाठी राष्ट्रवादी जोरदार प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे.
nधाराशिवचे सध्याचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळे या जागा मित्रपक्षांकडून मिळविणे अधिक सोपे असल्याचे राष्ट्रवादीला वाटते. 
nउत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव,  कोकणात रायगडसोबतच ठाणे, पश्चिम महाराष्ट्रात माढाची जागा आपल्याकडे खेचण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असेल, अशी माहिती आहे. 

विदर्भात कोणत्या जागांचा आग्रह?
विदर्भात गोंदिया-भंडारा, वाशिम-यवतमाळ आणि बुलडाणा या तीन जागांसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी खास आग्रही असेल आणि आतापर्यंत पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात या जागा अनुकूल असल्याचे दिसून आले आहे. 
विदर्भात लोकसभेच्या दहा जागा आहेत. त्यातील पाच भाजपकडे, तीन शिवसेनेकडे, एक अपक्ष आणि एक काँग्रेसकडे होती. काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यानंतर चंद्रपूरमध्ये पोटनिवडणूक झालेली नाही.
शिवसेनेचे तिन्ही खासदार, भावना गवळी (यवतमाळ-वाशिम), प्रतापराव जाधव (बुलडाणा), कृपाल तुमाने (रामटेक)  हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या
राष्ट्रवादीची तेथे जागा मिळवताना बरीच कसरत होईल.
भंडारा-गोंदिया हा प्रफुल्ल पटेल यांचा प्रभावपट्टा. मात्र तिथे भाजपचे खासदार आहेत. विद्यमान जागा भाजपच्या हातून घेण्याचे आव्हान असेल. बुलडाणा, यवतमाळ-वाशिममध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या हातून जागा घेण्याचे आव्हान राहील.

Web Title: NCP's insistence for 'these' seats can remain in the Grand Alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.