बलात्कारप्रकरणी नवी मुंबईतील पोलिसाला अटकपूर्व जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 05:46 AM2019-07-31T05:46:59+5:302019-07-31T05:47:22+5:30

उच्च न्यायालयाचा दिलासा : दोघांच्या संमतीने संबंध असल्याचे नोंदविले निरीक्षण

New Mumbai police granted bail for rape by high court | बलात्कारप्रकरणी नवी मुंबईतील पोलिसाला अटकपूर्व जामीन मंजूर

बलात्कारप्रकरणी नवी मुंबईतील पोलिसाला अटकपूर्व जामीन मंजूर

Next

मुंबई : सहकारी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या नवी मुंबई पोलिसाचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात मंजूर केला. या दोघांमध्ये एकमेकांच्या संमतीने संबंध होते, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले. नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अमित शेलार यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. इंद्रजीत महंती व न्या. ए.एम. बदर यांच्या खंडपीठापुढे होती.

नोव्हेंबर २०१८ मध्ये नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागात काम करत असलेल्या महिला हवालदाराने शेलार यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला. मार्च २०१८ मध्ये शेलार यांनी आपल्या पेयामध्ये काही तरी मिसळल्याने आपल्याला गुंगी आली आणि त्याचा फायदा घेत शेलार यांनी आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप संबंधित महिलेने केला. ‘सकृतदर्शनी हे कृत्य एकमेकांच्या संमतीने करण्यात आले आहे, असे आम्हाला वाटते,’ असे न्यायालयाने म्हटले.‘एफआयआरमध्ये नमूद केलेली घटना आणि आरोपी व तक्रारदाराने एकमेकांना पाठविलेले मेसेज यांचा विचार केला तर सहमतीनेच त्यांच्यात संबंध आल्याचे सकृतदर्शनी वाटते. ३१ वर्षीय विवाहित महिलेचा हा खटला आहे. पतीच्या नकळतपणे तिने अनेक वेळा सहकाऱ्याशी शारीरिक संबंध ठेवले आहेत. मात्र, पतीला जेव्हा या दोघांमधील मेसेजसबाबत समजले तेव्हा हा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.

नाहक गोवल्याचा आरोप
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, शेलार यांनी एकदा आपल्यावर बलात्कार करून त्याचे चित्रण केले आणि ते सर्वांना दाखविण्याची धमकी देऊन वारंवार आपल्यावर बलात्कार केला. मात्र, शेलार यांचे वकील तन्वीर निझाम यांनी सर्व आरोप फेटाळले. शेलार यांना नाहक या केसमध्ये गोवण्यात येत आहे. तक्रारदार आणि शेलार यांच्या सहमतीनेच शारीरिक संबंध होते, असे निझाम यांनी न्यायालयाला सांगितले.

Web Title: New Mumbai police granted bail for rape by high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.