Nitin Raut: फसलेली 'रिक्षा' पुढे ढकलण्यासाठी काँग्रेसच्या नितीन राऊतांची धडपड, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 07:26 PM2022-07-11T19:26:27+5:302022-07-11T19:30:57+5:30
राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन चाकी रिक्षा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं
मुंबई - राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक सत्तांतराच्या घडलेल्या घटनेनं राजकीय वर्तुळात अनेक बदल घडवले. गेल्या अडीच वर्षांपासून सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार काही दिवसांपूर्वीच कोसळलं. राज्यात पुन्हा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीचं सरकार आलं. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली अन् सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण, देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत असताना भाजप नेतृत्वाने मोठा धक्का दिला. कधी काळी रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यामुळे, राज्यात रिक्षावाल्यांची चर्चा सुरू झाली. त्यातच, आता माजी मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांचा एका फसलेल्या रिक्षा धक्का देतानाचा फोटो व्हायरल झाला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन चाकी रिक्षा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे या रिक्षाची तिन्ही चाके वेगवेगळ्या दिशेला असल्याचंही ते म्हणाले होते. त्यामुळे, हे सरकार किती काळ पूर्ण करेल याबाबत सातत्याने भाकितंही केली जात. अखेर, महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि कधी काळी रिक्षाचालक राहिलेल्या शिंदेंच्या हाती राज्याची धुरा आली. त्यामुळे, तीन चाकी रिक्षा गेली आणि आणि रिक्षाचालकाच्या हाती राज्याची धुरा आली, अशाही कमेंट सोशल मीडियातून पुढे आल्या.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही एकनाथ शिंदेच्या विधानसभेतील भाषणानंतर रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट होती, असं विधान केलं. त्यानंतर, त्यांच्यावरही भाजपकडून टिका करण्यात आली. तर, ठाण्यात रिक्षाचालकांनी मी रिक्षावाला, मी मुख्यमंत्री म्हणत आपला पाठिंबा एकनाथ शिंदेंना असल्याचं दाखवून दिलं. त्यामुळे, राज्यात सध्या रिक्षा आणि रिक्षाचालक यांची चांगलीच चर्चा होत आहे. त्यातच, काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी एका रिक्षाला धक्का देतानाचा फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. शाळकरी मुले बसलेली रिक्षा चिखलात रुतल्याचं या फोटोत दिसून येतं. या रिक्षाला नितीन राऊत यांच्यासह अनेकजण धक्का देऊन बाहेर काढत आहेत. या फोटोला राऊत यांनी कॅप्शनही दिलं आहे.
हम जनता के सेवक! pic.twitter.com/CUtHfg5tLP
— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) July 11, 2022
आम्ही जनतेचे सेवक अशी टॅगलाईन नितीन राऊत यांनी या फोटोला दिली आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.