केला ना भूकंप, आहे ना बहुमत, मग विस्तार कधी? : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 06:35 AM2022-07-26T06:35:18+5:302022-07-26T06:35:52+5:30
पत्रपरिषदेत पवार म्हणाले की, जनतेची कामे करायला सुरुवात करा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाविकास आघाडीची सत्ता असताना विरोधी पक्षनेते नेहमी मोठा भूकंप होणार असे म्हणत होते. आता केला ना भूकंप. आली ना तुमची सत्ता. राज्य घेतले ना ताब्यात?, बहुमत आहे ना तुमच्याकडे, मग मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी अडवले कोणी? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी केला.
पत्रपरिषदेत पवार म्हणाले की, जनतेची कामे करायला सुरुवात करा. राज्यातील जनता अतिवृष्टी आणि पुरामुळे भुकेने व्याकूळ आहे.
मात्र, तुमची सत्तेची भूक काही संपत नाही. ते अधिवेशनाच्या सारख्या तारखा देत आहेत अन् विस्तार लवकरच करू म्हणताहेत. पण, ना विस्तार झाला ना अधिवेशन. दोन मंत्र्यांचे सरकार असून या दोन्ही मंत्र्यांच्या हातात काहीच नाही, असा टोला त्यांनी लगावला. मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी पवार यांनी केली. नेहमीचे निकष बाजूला ठेवून अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्याची तसेच हवामान खात्याची यंत्रणा अचूक करण्याची मागणी त्यांनी केली.
ताम्रपट घेऊन आले का?
नवीन सरकारने गेल्या सरकारच्या कामांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे. आता तुमची सत्ता आहे म्हणून विकासकामे थांबवत असाल. पण, सतत तुमची सत्ता राहील असे नाही. हे दोघे काही सत्तेचा ताम्रपट घेऊन जन्माला आले आहेत का? असा थेट सवाल पवार यांनी केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय स्वीकारला असे सांगितले. मात्र, अधिवेशन होईल तेव्हा सभागृहात सांगेन कुठे दगड अन् कुठे धोंडा ठेवला, असा चिमटा त्यांनी काढला.