कोणीही सत्याचा आवाज दाबू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 04:19 PM2023-08-04T16:19:37+5:302023-08-04T16:19:55+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर देशातील विविध राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला असून मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी मिळालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा मिळणार आहे.
आडनावाच्या बदनामीच्या खटल्यावर शिक्षा सुनावत असताना राहुल गांधींना गुजरात न्यायालयाने सर्वाधिक असलेली दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांची खासदारकी रद्द व्हावी म्हणून ही शिक्षा सुनावण्यात आली का? त्यापेक्षा एक दिवसाची शिक्षा जरी कमी असती तर त्यांची खासदारकी रद्द झाली नसती. त्यामुळे या प्रकरणातील जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली हे हेतुपुरस्सर करण्यात आलं का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर देशातील विविध राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं आहे. सत्यमेव जयते! कोणीही सत्याचा आवाज दाबू शकत नाही. राहुल गांधी यांच्याबाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. राहुल गांधी तुमचे संसदेत स्वागत आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
सत्यमेव जयते!
— Supriya Sule (@supriya_sule) August 4, 2023
कोणीही सत्याचा आवाज दाबू शकत नाही. राहुल जी गांधी यांच्याबाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. राहुलजी गांधी तुमचे संसदेत स्वागत आहे.@RahulGandhi
दरम्यान, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, आजच लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून त्यांची भेट घेणार आहे. या निर्णयावर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. न्यायालयापेक्षा कोणीही मोठा नाही, हे न्यायालयाने सिद्ध केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देऊन लोकशाहीचा आवाज बळकट केल्याचे पायलट यांनी म्हटले आहे.