मैत्रीपूर्ण लढतीचा कोणताही प्रस्ताव नाही; चर्चेवर प्रफुल्ल पटेल यांचा खुलासा

By यदू जोशी | Published: September 10, 2024 03:28 PM2024-09-10T15:28:10+5:302024-09-10T15:28:38+5:30

जागावाटपात आमचा सन्मान राखला जाईल, असे आश्वासन अमित शाह यांनी आम्हाला दिलेले आहे, अशी माहितीही प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

No proposal for friendly fight says ncp leader Praful Patel  | मैत्रीपूर्ण लढतीचा कोणताही प्रस्ताव नाही; चर्चेवर प्रफुल्ल पटेल यांचा खुलासा

मैत्रीपूर्ण लढतीचा कोणताही प्रस्ताव नाही; चर्चेवर प्रफुल्ल पटेल यांचा खुलासा

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने २५ मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढती करण्याचा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाला दिला असल्याची चर्चा मंगळवारी दिवसभर होती. मात्र, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी असा कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे 'लोकमत'ला सांगितले. 

२५ मतदारसंघ असे आहेत की जिथे अजित पवार गटाला महायुतीत उमेदवारी दिली तर भाजपमध्ये बंडखोरी होऊ शकते किंवा भाजपला उमेदवारी दिली तर अजित पवार गटात बंड होऊ शकते. ही शक्यता लक्षात घेऊनच अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मुंबईत सोमवारी चर्चा करताना या ठिकाणी मैत्रिपूर्ण लढतींचा प्रस्ताव दिला. अर्थात या मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांनी लढावे असा हा प्रस्ताव असल्याची चर्चा होती. 

याबाबत पटेल म्हणाले की, आम्ही महायुतीचा घटकपक्ष आहोत आणि विधानसभा निवडणुकीतही सोबतच राहणार आहोत. काही ठिकाणी एकमेकांविरुद्ध लढायचे आणि काही ठिकाणी युतीत लढायचे ही कल्पना आम्हाला अन्‌ भाजपलाही मान्य होण्याचा प्रश्न नाही. त्यामुळे तसे अजिबात होणार नाही. जागावाटपात आमचा सन्मान राखला जाईल, असे आश्वासन अमित शाह यांनी आम्हाला दिलेले आहे. लवकरच जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल. 

अमित शाह यांच्यासोबतच्या चर्चेत अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला मुख्यमंत्रिपद पद द्या, अशी मागणी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. पटेल यांनी त्या बाबत स्पष्टपणे इन्कार केला. आम्ही मुख्यमंत्रिपद मागण्याचा आजतरी प्रश्न उद्‌भवत नाही असे ते म्हणाले.

Web Title: No proposal for friendly fight says ncp leader Praful Patel 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.