उत्तर मुंबईकराना काँग्रेसच्या “मराठी मुलगी”पेक्षा “मराठी मुलगा” लाडका

By रेश्मा शिवडेकर | Published: June 5, 2024 07:26 PM2024-06-05T19:26:40+5:302024-06-05T19:26:40+5:30

भूषण पाटील यांना उर्मिला यांच्या तुलनेत ८१ हजार मते अधिक मिळाली आहेत

North Mumbai Lok sabha Bhushan Patil got 81 thousand votes more than Urmila Matondkar | उत्तर मुंबईकराना काँग्रेसच्या “मराठी मुलगी”पेक्षा “मराठी मुलगा” लाडका

उत्तर मुंबईकराना काँग्रेसच्या “मराठी मुलगी”पेक्षा “मराठी मुलगा” लाडका

मुंबई - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबईकरांना २०१९मध्ये मराठी मुलगी म्हणून घातलेली साद फारशी प्रभावी ठरलेली नसताना काँग्रेसकडून आयत्यावेळी उमेदवारी जाहीर झालेल्या भूषण पाटील यांना मात्र भाजपच्या बालेकिल्ल्यात मतांचा टक्का २४ वरून ३१ वर नेण्यात यश आले आहे. पाटील यांना उर्मिला यांच्या तुलनेत ८१ हजार मते अधिक मिळाली आहेत.

उर्मिला यांनी २०१९मध्ये येथून २ लाख ४१ हजार ४३१ मते मिळविली होती. त्यांची एकूण मतांमधील टक्केवारी होती, २४ टक्के. तुलनेत भूषण पाटील यांनी मतांच्या टक्केवारीत सात टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. त्यांना एकूण ३ लाख २२ हजार ५३८ मते मिळाली आहेत.

मतदानाला अवघे १५ दिवस असताना पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. मालाडमधील मालवणी हा अल्पसंख्याकबहुल भाग वगळता या मतदारसंघात काँग्रेसची संघटनात्मक ताकद नसताना आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासारख्या भाजपच्या तगड्या उमेदवाराशी सामना असताना पाटील यांनी सव्वातीन लाख मते खेचून आणली आहेत.

या मतदारसंघात भाजपकडून जवळपास दोन महिने गोयल यांचा पद्धतशीरपणे प्रचार सुरू होता. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडून इथल्या कोकणवासीय प्रवाशांकरिता भरघोस प्रकल्प मिळविण्यापासून ते मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू कऱण्यापर्यंत आश्वासनांचा भडिमार येथील मतदारांवर सुरू असताना रोड शो, प्रचार यात्रा, मदरसे, मंदिरांना भेटी देत, भूमिपूत्र म्हणून प्रचारावर भर पाटील इथल्या मतदारांशी संवाद साधत होते.

पाटील यांच्या यशात स्थानिक उद्धवसेनेच्या नेत्यांचा मोठा वाटा आहे. काँग्रेसचे मोठे नेते या मतदारसंघात फारसे फिरकले नसताना मतदानाच्या दोन दिवस आधी खुद्द आदित्य ठाकरे यांनी या भागात रोड शो करत पाटील यांच्या मतांची टक्केवारी वाढविण्याला हातभार लावला होता.

उत्तर मुंबईत भाजपला शह देण्याकरिता काँग्रेसकडून २०१९मध्ये भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले होते. त्यावेळी मराठी मुलगी, कोकणकन्या म्हणून उर्मिला यांनी इथल्या मराठी पट्ट्यातच प्रचाराचा भर ठेवला होता. परंतु, काँग्रेसच्या “मराठी मुली”पेक्षा भूषण पाटील यांच्या रूपाने “मराठी मुलगा” लाडका ठरल्याचे दिसून येत आहे.

मराठी, अल्पसंख्यांकांची साथ

२०१९च्या तुलनेत बोरीवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप येथील मराठी मते वळवण्यात पाटील यांना यश आल्याचे दिसून येत आहे. येथील मराठी भागात पाटील यांच्या प्रचारात उद्धवसेनेचे दहिसर येथील माजी आमदार विनोद घोसाळकर उतरत असत. त्यामुळे या भागात काँग्रेसची ६० हजारांहून अधिक मते वाढली आहेत. दुसरीकडे मालाड-मालवणीमधून या अल्पसंख्याकबहुल भागातून गेल्या वर्षीच्या तुलनेत २० हजारांहून अधिक मते मिळाल्याने पाटील यांची टक्केवारी वाढली आहे.
 

Web Title: North Mumbai Lok sabha Bhushan Patil got 81 thousand votes more than Urmila Matondkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.