काँग्रेसचे अजूनही घोसाळकरांवर जाळे; उत्तर मुंबईत उमेदवार सापडेना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 08:34 AM2024-04-24T08:34:11+5:302024-04-24T08:36:09+5:30

जागावाटपात मुंबई उत्तर मतदारसंघ काँग्रेसकडे घेऊ नये, अशी भूमिका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांच्यासह मुंबई उत्तरमधील स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींना कळविली होती.

North Mumbai Lok Sabha Constituency - Congress unable to find candidate, Uddhav Sena's Vinod Ghosalkar offered to contest on Congress symbol | काँग्रेसचे अजूनही घोसाळकरांवर जाळे; उत्तर मुंबईत उमेदवार सापडेना

काँग्रेसचे अजूनही घोसाळकरांवर जाळे; उत्तर मुंबईत उमेदवार सापडेना

मुंबई : महाविकास आघाडीत जागावाटपात मुंबईतील दोन जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या असून, यातील मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार कोण द्यायचा, हा मोठा प्रश्न काँग्रेससमोर आहे. त्यामुळे उद्धवसेनेचे नेते विनोद घोसाळकर किंवा त्यांच्या सून तेजस्वी घोसाळकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवावी यासाठी काँग्रेसचे अजूनही प्रयत्न सुरू असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेसने यापूर्वीही विनोद घोसाळकरांना गळ घातली होती; मात्र, त्यांनी काँग्रेसकडून लढण्यास नकार दिला होता. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यासाठी उद्धव ठाकरेंनाही विनंती केली होती. मात्र, ठाकरेंनीही काँग्रेसचा हा प्रस्ताव मान्य केला नव्हता. आता पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंची भेट घेऊन ठाकरेंचे आणि घोसाळकरांचे मन वळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.

जागावाटपात मुंबई उत्तर मतदारसंघ काँग्रेसकडे घेऊ नये, अशी भूमिका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांच्यासह मुंबई उत्तरमधील स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींना कळविली होती. मात्र, तरीही हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला.  जागावाटप जाहीर झाल्यानंतर मुंबई उत्तर उद्धवसेनेने घ्यावा आणि त्या बदल्यात मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न झाले. मात्र, दोन्ही प्रयत्न फसल्यानंतर काँग्रेस अंतर्गत उमेदवाराचा शोध सुरू झाला. मात्र, भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना टक्कर देईल असा सक्षम उमेदवार सापडत नसल्याने काँग्रेसने पुन्हा घोसाळकरांसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत उर्मिला मातोंडकर, तर त्यापूर्वी २०१४ मध्ये संजय निरुपम हे दोन्ही बाहेरचे उमेदवार काँग्रेसने दिले होते.

 

Web Title: North Mumbai Lok Sabha Constituency - Congress unable to find candidate, Uddhav Sena's Vinod Ghosalkar offered to contest on Congress symbol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.