'काहीही लिहून दिलेलं नाही', अशोक चव्हाणांच्या सिनेमात शिवसेनेची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 04:06 PM2020-01-27T16:06:24+5:302020-01-27T16:07:36+5:30
अशोक चव्हाणांच्या वक्तव्यानंतर, आमचा सिनेमा हा मल्टिस्टारर सिनेमा असून तो यशस्वी होणा
मुंबई - काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या विधानानंतर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही भूमिका स्पष्ट केली. आमचा सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो सांगता येत नाही. सुदैवाने आमचा सिनेमा बरा चालला आहे, असे चव्हाण यांनी म्हटले होते. तसेच, शिवसेनेकडून लिहूनही घेतल्याचं चव्हाण यांनी सांगितले. त्यावर, शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदेंनी या विधानाचे खंडन केलंय.
अशोक चव्हाणांच्या वक्तव्यानंतर, आमचा सिनेमा हा मल्टिस्टारर सिनेमा असून तो यशस्वी होणार, असे थोरात यांनी म्हटलं. आता, या महाविकास आघाडीच्या सिनेमात शिवसेना नेते एकनाथ शिंदेचीही एंट्री झाली आहे. महाविकास आघाडी स्थापनेपूर्वी, संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे, असं न झाल्यास सरकारमधून बाहेर पडायचं अशी कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिली. याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या बाहेर जाणार नाहीत. घटना हीच शिरोधार्य मानून घटनेच्या चौकटीत सरकार चालणार, अशी भूमिका घेतली. त्यामुळे हे सरकार स्थापन झालं असं अशोक चव्हाणांनी नांदेड येथील कार्यक्रमात सांगितलं होतं.
तसेच, घटनाबाह्य काम करणार नाही असं शिवसेनेकडून लिहून घेतलं असून शिवसेनेने उद्देशाबाहेर काम केलं तर सत्तेतून बाहेर पडू असा इशाराच चव्हाण यांनी नांदेडमधील भाषणात बोलताना दिला. त्यावर, चव्हाणांच्या लिखीत स्वरुपाच्या वक्तव्याचं एकनाथ शिंदेंनी खंडन केलंय. अशोक चव्हाणांच्या विधानानंतर, संविधानाच्या चौकटीतून सरकार चालवण्यासाठी आम्ही बंधनकारक आहोत आणि तसंच सरकार चालणार आहे. किमान समान कार्यक्रमाशिवाय काहीही लिहून देण्यात आलेलं नाही, असेही शिंदेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं.